पिंपरी-चिंचवड : किवळेतील अपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
किवळे येथील मुकाई चौक ते निगडी भक्ती-शक्ती बीआरटी रोड समोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आदर्शनगर येथे या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. हा रस्ता अपूर्ण असून तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तो रस्ता पूर्णपणे बंद करावा. नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
किवळे मुकाई चौक ते निगडी भक्ती-शक्ती बीआरटीएस रोडच्या सुरुवातीस आदर्शनगर येथे के-व्हिले सोसायटीसमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यात ३० ते ३५ लोक पडले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते किवळेच्या मुकाई चौकापर्यंत अपूर्ण स्थितीमधील बीआरटी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत बीआरटी मार्ग सुरू करण्यात आलेला नाही. या मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिका आता १४ कोटींचा खर्च करून हे काम पूर्ण करणार आहे. त्यानंतरच हा बीआरटी मार्ग सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत या मार्गावरून जाणार्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे
हा रस्ता सामान्य माणसासाठी खुला करण्यात आला. पण, आर्दशनगर परिसरात पावसामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्ता अपूर्ण असताना देखील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. या प्रकाराला नागरिकांना खड्ड्यातून वाट काढत जावे लागत आहे. या अपूर्ण रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करून रस्ता खुला करावा अन्यथा आम्ही खड्ड्यात बसून आंदोलन करू,असा इशारा युवा सेनेचे राजेंद्र तरस यांनी दिला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.