अलीकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपला अहवाल सादर केला आहे. ‘एक्स’वर वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील अशा दहा देशांची यादी जाहीर केली आहे. ज्या देशांमध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात. या अहवालामध्ये प्रामुख्याने ३ कोटी डॉलर अर्थात २५० कोटी सं पत्ती असलेल्या लोकांना अतिश्रीमंत (धनाढ्य) असे मानण्यात आले आहे. या यादीमधील टॉप १० श्रीमंत देशांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, यूके, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.
अतिश्रीमंतांच्या देशांमध्ये अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत एकूण २,२५,०७७ अतिश्रीमंत लोक आहेत. ज्यांची एकूण संपत्ती ३० दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्या ठिकाणी अतिश्रीमंत श्रेणीमध्ये ९८,५५१ लोकांचा समावेश आहे. तिसरा क्रमांक जर्मनीचा असून, त्या ठिकाणी २९,०२१ इतके अतिश्रीमंत लोक राहतात. त्यानंतर अनुक्रमे कॅनडा (२७,९२८), फ्रान्स (२४,९४१), यूके (२३,०७२), जपान (२१,७१०), इटली (१५,९५४), ऑस्ट्रेलिया (१५,३४७) आणि स्वित्झर्लंड (१४,७४३) या देशांचा क्रमांक लागतो. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपल्या अहवालात जारी केलेल्या टॉप श्रीमंत देशांच्या यादीमध्ये भारताला ११ वे स्थान देण्यात आले आहे. अर्थात भारत पहिल्या टॉप १० श्रीमंत देशांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. भारतात सध्याच्या घडीला एकूण १३,२६३ श्रीमंत लोक आहेत. ज्यांची एकूण संपत्ती ३ कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.