संग्रहित छायाचित्र
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्पात आहे. आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्याच महाविकास आघाडी आणि महायुती यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झाले नाही. पण शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० जागा मिळतील, असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे.त्यामुळे राज्यात महायुतीला पोषक वातावरण आहे. लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होणार नाही. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे.
बहूमत मिळाल्यास एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महायुतीत वाद निर्माण होतो की काय अशी स्थिती आहे. महायुतीत मुख्यमंत्री कोण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे. पण निकालानंतर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय घेतला जाईल, असे महायुतीकडून सांगण्यात आले आहे.
निकालानंतर मिळणार वेगळे सरप्राईज-राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने राज्यभर दौरे करत आहेत. यंदा मनसने मोठ्या संख्येने आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि मनसेच्या पाठिंब्यांवर महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे सांगितले आहे. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे.