संग्रहित छायाचित्र
जवळपास आता प्रत्येक राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा गुऱ्हाळ संपल्यात जमा आहे. निवडून येण्याची क्षमता हा एकमात्र निकष समोर ठेवत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या सगळ्या घडामोडीत पक्षनिष्ठा, विचारसरणी, उमेदवाराचे सार्वजनिक चारित्र्य या बाबी नेहमीप्रमाणेच दुय्यम ठरवण्यात आल्या आहेत. तुतारी हे पक्षचिन्ह असलेल्या पक्षाने इतर पक्षातील नाराजांना मैदानात उतरवले आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसने असा नाराज लोकांचा पुरवठा इतर पक्षांना केलेला दिसतो आहे.
महायुतीतील जागावाटपाचे सूत्र लक्षात घेत भाजपच्या माजी आमदारांनी यापूर्वीच तुतारी हातात घेतली आहे. यात अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील, उदगीरच्या सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदापुरात अजित पवार राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासमोर विनायकराव पाटलांचे आव्हान आहे. त्यामुळे तिथे भाजपचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी 'रासप'च्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलन आणि एकवटलेले ओबीसी यामुळे दोन मराठा उमेदवारांत तिथे खंदाडे यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी एकदा खंदाडे यांनी हा पराक्रम केलेला आहे. उदगीरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव अशी लढत आहे. संघ आणि भाजपशी संबंधित असूनही ही जागा अजित पवार गटाकडे गेली आहे.
आयुष्यभर पक्षाचे काम मोठ्या निष्ठेने करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि वर्षानुवर्षे घरात सत्ता असताना यावेळी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणारे यांच्यात तशी मोठी तफावत असतेच. मात्र हा प्रकार दोन्ही राष्ट्रीय पक्षात पाहायला मिळत आहे. वाशीम मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत लखन मलिक यांनी बंडखोरीचा पवित्र घेतला आहे. तिकडे मराठवाड्यात निलंगा मतदारसंघातील संगीता निलंगेकर यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. संगीता निलंगेकर या माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकरांच्या सून आहेत. पती अशोक निलंगेकरांना तिकीट न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीने काही बळ दाखवता येते का याची चाचपणी त्यांनी केली आहे. लोकसभेत सांगलीत जसा प्रकार घडला तसा प्रकार या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये देशमुखांच्या दोन मुलांना तिकीट देऊन काँग्रेसने आपण घराणेशाहीची तत्त्व अबाधित राखल्याचे कबूल केले आहे. काँग्रेसचे माजी महापौर गोजमगुंडे, दीपक सूळ यांना डावलून अमित देशमुखांनी या कार्यकर्त्यांनी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतेच काम पाहायचे, अशी विभागणी करून घेतली आहे.
गोपीनाथ मुंडे- विलासराव देशमुख यांच्या पश्चात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सेटिंग संस्कृती अबाधित राहिल्याचे पाहायला मिळालेले आहे. फडणवीसांनी ग्रामीण आणि शहर हे दोन्ही मतदारसंघ देशमुखांना आंदण देत औशातून अभिमन्यू पवारांना पहिल्यांदा आमदार केलेले आहे. आता सेटिंग केल्याचा आरोप गाजल्यामुळे यंदा भाजपने ग्रामीणमधून रमेश कराड यांना मैदानात उतरवले आहे. शहर लातूरच्या जागेवर कमकुवत उमेदवार देत अमित देशमुखांना मदत करायची आणि त्या बदल्यात औसा मतदारसंघातील अभिमन्यू पवारांचा विजय सोपा करायचा, अशी शक्यता असू शकते. कदाचित शहरातही अर्चना पाटील चाकूरकरांना तिकीट देऊन भाजप खरेखुरे राजकारण करू शकतो.
आपल्याच घरात तिकीट मिळायला हवे असा हट्ट धरणाऱ्या नेत्यांनी पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा पर्याय धुंडाळलेला आहे. जिथे तिकीट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कन्या संजना जाधव याना शिंदे शिवसेनेकडून कन्नड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवून दिली आहे. संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी आहेत. कन्नडच्या राजकारणात त्या सक्रिय सहभागी असतात. कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली. त्यामुळे संजना जाधव शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर उबाठा गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांचे आव्हान आहे. भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण
यांना भाजपने संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भोकर अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आपल्या मुलीला निवडून आणणे अशोक चव्हाण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. कारण अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतरही नांदेड लोकसभा भाजपला गमवावी लागली होती. आता भाजपकडून या मतदारसंघात चव्हाण यांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचेच काम बाकी आहे. याखेरीज शिवसेना ठाकरे गटाकडून बडनेरा मतदारसंघामधून प्रीती बंड यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ऐनवेळी सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे प्रीती बंड नाराज झाल्या. यानंतर आता प्रीती बंड यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.