PUNE POLITICS: शिरूरमध्ये कोण देणार अमोल कोल्हेंना चॅलेंज? पार्थ की पूर्वा?

पुणे: राज्य विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अजित पवारांनी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना ‘तू निवडून कसा येतो, तेच बघतो’ असे आव्हान दिले होते आणि शब्दाला जागत त्यांनी शिवतारेंना निवडणुकीच्या रिंगणात पराभवाची धूळ चारली होती.

संग्रहित छायाचित्र

शिरूरमध्ये पार्थचे सेकंड लॉचिंग? ; शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही दावा

पुणे: राज्य विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अजित पवारांनी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना ‘तू निवडून कसा येतो, तेच बघतो’ असे आव्हान दिले होते आणि शब्दाला जागत त्यांनी शिवतारेंना निवडणुकीच्या रिंगणात पराभवाची धूळ चारली होती. त्या घटनेपासून अजित पवार हे जे म्हणतात ते करून दाखवितात असे म्हटले जाऊ लागले. आता त्याचीच पुनरावृत्ती करत अजित पवारांनी  शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिले आहे. हे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. कोल्हे यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजीराव आढळराव, महेश लांडगे अशी अनेक नावे चर्चेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे- पाटील यांची नावेही सध्या चर्चेत आहेत.

आपल्या काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन बाहेर पडलेल्या अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचे सर्वात प्रथम रणशिंग फुकले ते शिरूर लोकसभा मतदारसंघात. त्याचे कारण म्हणजे आपण निवडून आणलेले खासदार अमोल कोल्हे आपल्यासमवेत येत नसल्याचे पाहून त्यांनी कोल्हेंना निवडणुकीच्या मैदानात चारी मुंड्या चित करण्याची घोषणा केली. कोल्हेंच्या विरोधात खुद्द अजितदादांचा मुलगा पार्थ, दिलीप वळसे-पाटील किंवा त्यांची कन्या पूर्वा अशी नावे सध्या चर्चेत आहेत. हा मतदारसंघ अद्याप कोणाकडे जाणार हे निश्चित नसले तरी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही दावा ठोकलेला आहे.

शिरूरमध्ये पार्थचे सेकंड लॉचिंग?

गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून दारुण पराभव झाला होता. यावेळीही ते पुन्हा मावळमधून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अर्धा मतदारसंघ जिल्ह्याबाहेर असलेल्या मावळपेक्षा आपल्या जीवाभावाचे नेते असलेल्या शिरूरमधून पार्थला लढविण्याचा विचार अजित पवार करू शकतात. पार्थ पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात काही बैठकाही घेतल्या आहेत.

आव्हान-प्रतीआव्हान

राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये फुट पडल्यावर संपूर्ण राज्यातीलच राजकीय समीकरण जसे बदलले तसे शिरूर लोकसभा मतदारसंघातील समीकरणही बदलले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत असताना सलग तीनवेळा जिंकलेला हा मतदारसंघ गेल्यावेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने खेचून आणला होता. त्यानंतर या मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर या पाच जागाही राष्ट्रवादीने जिंकल्या. केवळ भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे निवडून आले. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार वगळता चारही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. शरद पवारांसोबत राहिलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापुढे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर  शिरूरमध्ये आपला  उमेदवार निवडून आणणारच, असे आव्हान अजित पवारांनी दिल्यावर खासदार कोल्हे यांनीही  मी १०० टक्के  निवडणूक लढवणार आणि निवडून येणार अशी घोषणा केली. याबाबत शरद पवार जो घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असेही कोल्हेंनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार कोल्हेच असतील यात काही शंका नाही.

२०१९ मध्ये अमोल कोल्हे यांनी ४९.१७टक्के मते मिळविली होती. त्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत शिवाजीराव आढळराव यांनाअनुक्रमे ५९.०६ आणि ५७.५४ टक्के मते मिळाली होती.   २०१४ मध्ये या मतदारसंघात ५९.७३ टक्के मतदान झालं होतं. १८ लाख २४ हजार ११२ मतदारांपैकी १० लाख ८९ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांनी  तब्बल ३ लाख १ हजार ८१४ मतांनी हा गड राखला होता.  त्यांना ६ लाख ४३ हजार ४१५ मतं पडली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवदत्त निकम यांना ३ लाख ४१ हजार ६०१ मतं पडली होती. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत २०१९ मध्ये आढळरावांविरुद्ध राष्ट्रवादीने लोकप्रिय टीव्ही कलाकार अमोल कोल्हे यांना उतरवले. त्यावेळी शिरूर मतदारसंघात ५९.४४ टक्के मतदान झाले होते. २१ लाख ७५ हजार ५२९ मतदारांपैकी १२ लाख ९३ हजार ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अभिनेते अमोल कोल्हे  यांनी ५८ हजार ४८३ मतांनी पराभव केला. आढळरावांना ५ लाख ७७ हजार ३४७ मतं पडली होती. अमोल कोल्हेंना ६ लाख ३५ हजार ८३० मतं पडली होती. २०१४ च्या तुलनेत ही निवडणूक तशी चुरशीची झाली होती. विजेत्या आणि पराभूत उमेदवारांत तसा फार फरक नव्हता. २०१९ च्या निवडणुकीत भोसरी मतदारसंघात शिवाजीराव आढळराव यांना ३८ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते.  हडपसरमधून ७ हजार तर खेड विधानसभा मतदार संघातून ६ हजारांचे मताधिक्‍य आढळराव यांना मिळाले होते.  जुन्नर, शिरुर व आंबेगाव मतदार संघातून कोल्हेंना चांगले मताधिक्‍य मिळाल्याने आढळरावांना पराभवाचा सामना करावा लागला. आता शिरूर वगळता दोन्ही ठिकाणचे आमदार कोल्हे यांच्या विरोधातील आहेत. 

आढळरावांचे काय?

राष्ट्रवादीतील फुटीपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिंदे गटाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, आता महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाकडे जाते की अजित पवारांकडे असा वाद निर्माण झाला आहे. आढळराव अजित पवार गटात जाण्याची चर्चाही मागील काळात सुरू होती. आढळराव पाटील यांना सलग तीन निवडणुका लढविण्याचा अनुभव आहे. वळसे-पाटील आणि आढळराव एकत्र आल्यास या मतदारसंघातील समीकरण बदलू शकते. शिवाजी आढळराव पाटलांनी २००४ साली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्मितीनंतर २००९ आणि २०१४  अशा सलग लोकसभा निवडणूका जिंकल्या होत्या. आढळराव २०१९ ला विजयाचा चौकार मारणार अशीच परिस्थिती होती. मात्र, आढळरावांचा विजयाचा रथ राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी रोखला होता.

वळसे- पाटील की पूर्वा?

दिलीप वळसे-पाटील यांचे एकेकाळचे जीवलग मित्र शिवाजीराव आढळराव सलग तीन वेळा शिरूरमधून निवडून आले होते. त्यावेळी अनेकदा दिलीप वळसे-पाटील यांना लढण्याचा आग्रह केला जात असे. मात्र, प्रत्येक वेळी वळसे-पाटील यांनी नकार दिला. यावरून अजित पवार आणि त्यांच्यात मतभेदाची ही चर्चा होती. मोदी सरकारने मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा दिलीप वळसे-पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, ते स्वत: लढतात की आपल्या कन्या पूर्वा यांना लॉच करतात याबाबत उत्सुकता आहे. आता पूर्वा वळसे-पाटील यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत.

कोल्हे यांच्याबाबत घेतला जाणारा आक्षेप

अमोल कोल्हे यांच्याबाबत घेतला जाणारा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे ते मतदारसंघात लक्ष देत नाहीत हा. एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं.  निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं आहे. मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. शिरूर लोकसभा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा आंबेगाव- शिरूर मतदारसंघ, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, हडपसरचे आमदार चेतन तुपे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे.  भोसरी विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात अजित पवार समर्थक आहेत. शरद पवार यांच्यासोबत शिरूरचे आमदार अशोक पवार असले तरी सध्या भाजपमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हेदेखील अजित पवार समर्थक मानले जातात.  यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा आहे.

महेश लांडगेंची दरवेळी चर्चा

भोसरीचे आमदार महेश लांडगे गेल्या दोन निवडणुकांपासून लोकसभा लढणार अशी हवा होत असते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बॅनर लावल्यावरून चर्चा होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी झाल्यावर भाजपने हा मतदारसंघ स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी सुरू केली होती. त्याप्रमाणे भाजपने मिशन २०२४  साठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, आता अजित पवार गट आणि शिंदे गटातच रस्सीखेच सुरू असल्याने भाजपकडून ही जागा लढविली जाण्याची शक्यता कमीच आहे.

विलास लांडे पुन्हा इच्छुक 

२०१९ ला विलास लांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती. त्यावेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली. आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने विलास लांडेंनी मतदारसंघात भावी खासदार अशी फ्लेक्सबाजीदेखील केली आहे. लांडे यांनी २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest