बीडीपी विकास आराखडा तयार करा
शहराच्या विकास आराखड्यात आसपासच्या अनेक टेकड्यांवर बीडीपीचे (बायो डायव्हर्सिटी पार्क) (BDP Development Plan) आरक्षण टाकण्यात आले आहे. असे असले तरी, या टेकड्या फोडल्या जात आहेत, त्यावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे यावर संताप व्यक्त करत टेकड्या वाचवायच्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत बीडीपी आरक्षण असलेल्या जागा वाचविण्यासाठी त्याचा विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी महापालिकेकडे(PMC) केली आहे.
बीडीपी विकास आराखडा तयार करा, या मागणीचे निवेदन खासदार चव्हाण (Vandana Chavan) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. यावेळी माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे, वास्तूविशारद अनित बेनेंजर, अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम, नितीन जाधव उपस्थित होते. ‘‘शहराच्या विकास आराखड्यात आसपासच्या अनेक टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र, या टेकड्या फोडल्या जात आहेत, त्यावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. याबाबत अनेक वेळा महापालिकेचे लक्ष वेधण्यात आले. परंतु त्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही,’’ अशी खंत अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली.
आरक्षण टाकण्यात आलेल्या काही जागा या खासगी मालकीच्या आहेत. त्यांना आरक्षणाच्या बदल्यात मोबदला लवकर दिला पाहिजे. त्याचाही निर्णय त्वरित घेणे आवश्यक असल्याचेही अॅड. चव्हाण यांनी नमूद केले. बीडीपीचे आरक्षण असलेल्या क्षेत्रावर संरक्षक कुंपण उभे करावे, अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, बीडीपी क्षेत्राच्या विकासाकरिता स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा, या जागांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी सात-बारा उतार्यावर बीडीपी आरक्षणाची नोंद करावी, खासगी आणि सरकारी जागा असे वर्गीकरण करावे, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन खासदार चव्हाण यांना दिले.
शहराची झपाट्याने होत असलेली वाढ, भरघोस एफएसआयच्या वाटपाचा निर्णय (ज्याला आमचा विरोधही आहे), हवामान बदलाचे गंभीर परिणाम, ढगफुटी, पूर येणे, उष्णतेच्या लाटा, हवेची खालावत जाणारी गुणवत्ता, रोगराई, भूगर्भातील पाणी कमी होणे अशा गोष्टी लक्षात घेता शहराच्या हिरव्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
- अॅड. वंदना चव्हाण, खासदार