बेडूकउड्या आणि डरॉव-डरॉव; राज्यात आलाय उखळ पांढरे करण्याचा हंगाम, नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मालामाल होण्याची संधी

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. टप्या-टप्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे घोषित करायला लागला आहे. या यादीत नाव नसले की तयारीत असलेले नेते इकडून तिकडे उद्या मारताना दिसत आहेत

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. टप्या-टप्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे घोषित करायला लागला आहे. या यादीत नाव नसले की तयारीत असलेले नेते इकडून तिकडे उद्या मारताना दिसत आहेत. ज्यांना पक्षाकडून संधीची अपेक्षा होती मात्र ती फलद्रुप झाली नाही असे नेते अन्य पर्याय धुंडाळत आहेत. जर सत्तेसाठी विचारसरणी, निष्ठा आड येऊ न देता नेते अशा उड्या मारत असतील तर कार्यकर्त्यांनी याचा विचार का करावा? त्यांनीही सोईनुसार पक्ष बदलायला सुरुवात केली आहे. हा सगळा प्रकार बेडकांनाही लाजवेल, असा नक्कीच आहे.

महाराष्ट्रात सध्या निवडणूक आली आहे, त्यामुळे नेते हात जोडत आहे आणि मतदार संभ्रमित झाला आहे. इतरवेळीही मतदार फारसा सजग असतो असे नाही. मात्र निवडणूक झाल्यावर मायबाप सरकारचा अनुभव घेताना तो आपण यांना का सत्ता दिली या विचाराने भ्रमित झालेला असतो. आता लोकप्रतिनिधी निवडण्याची, मायबाप ठरवण्याची त्याची वेळ आली आहे. मात्र यावेळी त्यांच्यासमोरील परिस्थिती अधिकच विचित्र आहे. कारण सहा पक्ष दोन आघाड्यात विभागले गेले आहेत. याव्यतिरिक्त अजून दोन आघाड्या आहेत. या सगळ्यातून आपला योग्य उमेदवार निवडायचा म्हणजे मतदारांसाठी कोळशातून हिरा निवडल्यासारखेच आहे.

महायुतीत (Mahayuti) तिकीटाची अपेक्षा असणाऱ्यांना तिकिटासाठी जर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्रवेश करायला अडचण नसेल आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांना वंचितच्या तिकिटावर लोकांना सामोरे जाण्यात कमीपणा वाटत नसेल तर मतदारांना मतदान करताना तो का वाटावा? त्यामुळे मग दोन प्रमुख राजकीय आघाड्यांत इकडून तिकडे जाण्याची शर्यतच जणू सुरु झाली आहे, अशी परिस्थिती आहे. पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांची समजूत घालता येऊ शकते. पण तोच उद्या प्रमुख विरोधक म्हणून मैदानात उतरला तर काय? म्हणजे एका आघाडीतील एखाद्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष एका रात्रीत दुसऱ्या आघाडीतील एखाद्या घटकपक्षाचा उमेदवार सहज होऊ शकतो. तशी उदाहरणेही राज्यात घडताना दिसत आहेत.

मॉन्सूनपूर्व काळात आपल्याला जसे बेडके दिसायला लागली की पावसाळ्याची चाहूल लागते. त्याप्रमाणेच आपल्या परिसरात नेते, पुढारी म्हणून मिरवणारी मंडळी दिसू लागली की निवडणुकीची चाहूल लागत असते. आता तर चक्क बेडकांना लाजवतील अशा आवेगात तिकीट न मिळालेले इच्छुक कार्यकर्ते उद्या मारताना दिसत आहेत. भाजपने तिकीट नाही आले तर जा शिवसेनेत. शिवसेनेने तिकीट नाकारले तर जा राष्ट्रवादीत. तिथेही दाळ शिजली नाही तर काँग्रेस आहेच. केवळ यावेळी यात किरकोळ तफावत झाली आहे.  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि उरलेली शिवसेना, उरलेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाआघाडी आहे. अर्थात त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांचे काही बिघडत नाही. महायुतीतून तिकीट नाही मिळाले तर महाआघाडी आहेच. या दोन आघाड्यांनी तिकीट नाकारले तर तिकीट द्यायला संभाजीराजे छत्रपती, बचू कडू आणि राजू शेट्टी यांची आघाडी आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचा पर्याय आहे. या सगळ्यात संधी नाही मिळाली तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचा पर्याय शिल्लक आहेच.  


उपसरपंचाने बदलले २ दिवसांत ४ पक्ष


एकीकडे बडे नेते पक्ष बदलताना दिसत आहेत. अशा वेळी काही छोटे नेतेही या वाहत्या गंगेत हात धुवून घेताना दिसत आहेत. अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघात घडली आहे. इथे एका उपसरपंचाने एक नाही तर चार पक्ष बदलले आहे. ते ही दोन दिवसात. त्यामुळे त्यांच्या या पक्षा प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. प्रत्येक मतदार, छोटा-मोठा नेता या निवडणुकीत महत्वाचा समजला जात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या गटात सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील यांना खेचण्याचा प्रयत्न करत आहे. रामलू राठोड हे राजूरा तालुक्यातल्या सुब्बईचे उपसरपंच आहेत. आधी ते काँग्रेसमध्ये गेले. तिथल्या पक्ष प्रवेशावेळी घातलेल्या फुलांची माळ सुकत नाही तोच त्यांना शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला. पण हा झेंडा बाजूला सारून त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात पकडला. बरे आता तरी ते थांबतील असे वाटत असतानाच त्यांनी काँग्रेसचा हात पुन्हा एकदा अलगद सोडला आणि भाजपचे कमळ हाती घेतले. हे सगळे अगदी दोन दिवसांत करून दाखवले आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश केले. त्यामुळे दोन दिवसांत चार पक्षात प्रवेश करण्याचा विक्रमच राठोड यांनी केला. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest