Lalit Patil case : डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, रवींद्र धंगेकर उतरले रस्त्यावर

'ससून'चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (ता. २९) ठिय्या आंदोलन केले.

डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, रवींद्र धंगेकर उतरले रस्त्यावर

पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

पुणे : ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करून इतर दोषी अधिकाऱ्यांना अटक करा, 'ससून'चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (ता. २९) ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेवून त्यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले.

ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची फाईल अद्याप बंद झाली नाही. मात्र, शासनाच्या दबावामुळे पोलीस संथ गतीने तपास करीत आहेत. दोषी अधिकाऱ्यांना अटक करीत नाहीत. त्यांची चौकशीही केली जात नाही. या विरोधात रवींद्र धंगेकर यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

...तोवर आम्ही शांत बसणार नाही

धंगेकर म्हणाले, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला. ज्या व्यक्तींनी ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केली, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. ससून मधून तो ड्रग्ज विकत होता. हे प्रकरण माहिती असूनही याकडे डोळेझाक करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ससूनमध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, काही वरिष्ठ पोलीस हे ललित पाटीलचे लाड पुरवत होते. त्यांची कसून चौकशी करून कारवाई होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही. लोकशाही मार्गाने आमचा लढा सुरूच राहील.

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. ते चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्यावर झालेली कारवाई पुरेशी नसून त्यांना अटक करण्यात यावी. त्यांना सहआरोपी करून, त्यांच्यावर मोक्का  अंतर्गत कारवाई व्हायला हवी. पण, पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर शासनाचा दबाव आहे. शासनातील ती मोठी व्यक्ती कोण आहे? हे जनतेला समजले पाहिजे. ललित पाटीलकडून कोणकोणते साहित्य, रोख रक्कम किती जप्त केली आहे, याबाबत पोलिसांकडून माहिती दिली जात नाही, असे धंगेकर यांनी सांगितले. या आंदोलनात गोपाळ तिवारी, बुवा नलावडे, प्रविण करपे, राजू नाणेकर, सुरेश जैन, प्रशांत सुरसे, गोपाळ आगरकर, सुरेशकांबळे, संदीप मोरे, ऋषिकेश बालगुडे, साकिद आबाजी, राकेश नामेकर, गौरव बाळंदे, रिपब्लिकन संघर्ष दलाचे संजय भिमले, जयहिंद संघटनेचे सुनील नवले, हेमत वाशीकर आदी उपस्थित होते.

ललित पाटील एक नव्हे; अनेक आहेत

ड्रग्ज माफीया ललित पाटील याला अटक झाली असली तरी याच्यासारखे ललित पाटील अनेक आहेत. ते पंजाबच्या खालोखाल पुण्याला या अमलीपदार्थांच्या विश्वात ओढत आहेत. काही पब, हुक्का पार्लरमध्ये याची राजरोसपणे विक्री होत आहे. या सर्व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे बाकीच्या 'ललित पाटील'ला चाप बसेल आणि पुण्याचे आरोग्य, पुण्याचे भविष्य सुरक्षित राहील, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest