मराठवाड्यात 'वाक्पटू' उमेदवारांना पुन्हा संधी? शिंदे गट शिवसेनेचे बहुतांश उमेदवार वादग्रस्त विधानांचे धनी

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील फुटीनंतर मराठवाड्यातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या नऊ आमदारांसह माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वादामुळे दुष्परिणाम होणार नसल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील फुटीनंतर मराठवाड्यातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या नऊ आमदारांसह माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यातील नांदेडचे बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे वगळता बहुतांश उमेदवार वादाच्या रिंगणात उभे आहेत. मात्र, या वादांचा निवडणुकांवर काही एक परिणाम होणार नाही, असा दावा शिवसेनेच्या वतीने केला जातो.

मराठवाड्यातील मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांच्यासह आमदार संतोष बांगर ही नावे तर सतत वादात होती. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आपल्या पहिल्या वक्तव्यापासून ते कार्यशैलीमुळे सतत चर्चेत होते. ‘कोण तो हाफकिन?, त्याच्याकडून औषध घेणे बंद करा’ असे ते म्हणाले होते. हाफकिन हा माणूस महाराष्ट्रात राहतो आणि त्याला आपल्याला सूचना देता येतात, असा त्यांचा समज असल्याचे चित्र माध्यमांमधून प्रस्तुत झाले होते. मात्र, त्यावर खुलासा करत ‘माझी शैक्षणिक अर्हता माध्यमांनी तपासावी. हे सरकार आल्याचे माध्यमांना रुचले नाही. म्हणून त्यांनी हे वक्तव्य पसरवले,’ असा त्यांचा खुलासा होता. ‘अजित पवार यांच्या शेजारी बसताना उलटी व्हायला होते’, असेही ते अलीकडेच म्हणाल्याने वाद झाले होते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे यावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना फोडण्यासाठी मदत केल्याचे जाहीरपणे सावंत यांनी केलेले वक्तव्य गाजले होते. सतत वादाच्या रिंगणातील तानाजी सावंत आता पुन्हा परंडा मतदारसंघातून निवडणुकीत उभारणार आहेत.

शिंदे मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भोवतीही सतत वादाचे रिंगण होते. आपल्या कार्यशैलीने आणि वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोरही त्यांनी अडचणी निर्माण केल्या. त्यांनी कृषिमंत्री म्हणून बियाणांच्या तपासणीसाठी एक नवीच यंत्रणा उभी केली. त्यामुळे विधिमंडळात त्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या. शेवटी त्यांना अल्पसंख्याक मंत्रिपद दिल्यानंतर काही अंशी त्यांच्याविषयीचे वाद कमी झाले. सिल्लोड कृषी महोत्सवात तिकीट लावण्यापासून ते लोकसभा निवडणुकीनंतर ‘शिवसेनेबरोबर माझा प्रासंगिक करार आहे’ असे म्हणण्यापर्यंतची वक्तव्ये करूनही सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिशी घातल्याचे चित्र सत्ताधारी गटात होते. आपल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. त्यामुळे सतत वादाच्या रिंगणातील व्यक्तीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा विश्वास दाखवल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील तिसरे वादग्रस्त आमदार म्हणजे संतोष बांगर. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डोळ्यात पाणी आणून दोन दिवस उद्धव ठाकरेंबरोबर असणारे बांगर नंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. पीक विमा न देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यापासून ते त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांवर भाजपनेही आक्षेप घेतले होते. कळमनुरीमधून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी बाहेरून मतदारसंघात येणाऱ्या मतदारांना ‘फोन पे’ करा या वक्तव्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. वादाच्या रिंगणातील हे तिसरे उमेदवार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे मराठवाड्यातील बहुतांश उमेदवारांना वादाची पार्श्वभूमी आहे. मात्र या वादांचा निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. विविध वादातील दोन मंत्री आणि आमदारांना सांभाळताना मराठवाड्यातून पुन्हा शिवसेनेचे बळ वाढविले ते संदीपान भुमरे यांनी. मद्य विक्री हा व्यवसाय असल्याचे शपथपत्रात नमूद केल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने त्यांच्यावर ‘मद्यसम्राट’ उमेदवार अशी वारंवार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांच्या मुलास यंदा उमेदवारी देण्यात आली आहे. वडील रोजगार हमीमंत्री असताना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून ‘जनता दरबार’ भरवणारे विलास भुमरे यांना शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पैठणची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा उमेदवार अद्यापि ठरलेला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest