‘उलटा चोर कोतवालको डांटे’
#नवी दिल्ली
ज्यांनी लोकशाहीची तत्त्व झुगारून लावली. घटनात्मक यंत्रणांचा दुरूपयोग केला आहे. त्यांच्यासाठी लोकशाही, राज्यघटना या मूल्यांना काहीच किंमत नाही, तेच लोकशाहीच्या नावाने टाहो फोडत आहेत. 'उलटा चोर कोतवाल को डांटे' ही उक्ती भाजपला अचूक लागू होत असल्याचे सांगत सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष
म िल्लकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर पलटवार केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातील पहिला दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाने गाजला. सत्ताधारी भाजपने राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज दोन वेळा थांबवावे लागले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या विधानामुळे भारतीय लोकशाहीचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना खर्गे यांनी, ज्यांनी लोकशाहीची तत्त्व झुगारून दिली आहेत. ज्यांनी घटनात्मक यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे असे भाजपवालेच लोकशाही, राज्यघटना याबद्दल तक्रार करत असल्याचा निशाणा साधला. मोदी सरकार मनमानी कारभार करत सुटले आहे. मोदी सत्तेवर आल्ल्यापासून संपत्तीत वाढ झालेल्या अदानी उद्योगसमूहाबाबत संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी आम्ही केली होती. मोदी सरकारने ही समिती स्थापन करायला नकार दिला असल्याचे खर्गे म्हणाले आहेत.
मोदींनी अनेक वेळा हा पराक्रम केलेला आहे
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी परदेशात दिलेल्या व्याख्यानात भारताची बदनामी केली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. लोकसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या मुद्यावर काँग्रेसला धारेवर धरले, तर राज्यसभेत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दोन्ही सभागृहात त्याबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. भाजपच्या या आरोपांचे खंडन करताना खर्गे यांनी, परदेशात जाऊन भारताची प्रतिष्ठा घालवण्याचा पराक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेळा केलेला आहे, असे सांगत त्यांनी देशाची
माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधींची पाठराखण केली आहे. स्वतः मोदी हुकूमशहा असल्यासारखे देशाचा कारभार चालवत आहेत आणि विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले की लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा करत असल्याचेही खर्गे म्हणाले.
वृत्तसंस्था