संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अपमान हा सामान्य कुटुंबातून आलेल्या शेतकरी पुत्राचा विरोधक अपमान असल्याचे सांगत भाजपचे अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. हा संपूर्ण जाट समुदायाचा अपमान आहे. खर्गे चक्क चेअरमनला चियरलिडर म्हणताहेत. विशेष म्हणजे सोनिया गांधी या खर्गे यांच्या विधानावर काहीच बोलत नाहीत. हीच तर काँग्रेसची संस्कृती आहे, अशा शब्दांत नड्डा यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे.
धनखड हेच सरकारचे प्रमुख प्रवक्ते आहेत, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी ‘इंडिया’ आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या शेतकरी पुत्राचा विरोधक अपमान करत असल्याचा आरोप भाजपने केला. धनखड यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. ‘धनखड यांच्या गेल्या तीन वर्षांतील पक्षपाती वागणुकीमुळे आम्हाला त्यांच्याविरोधात प्रस्ताव आणावा लागला आहे. या प्रस्तावाला धनखड जबाबदार आहेत’, अशा शब्दांत खर्गे यांनी प्रस्तावाचे समर्थन केले. धनखड यांचे पक्षपाती वर्तन घटनाविरोधी आहे असा आरोप विरोधकांनी केला. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या ६० हून अधिक सदस्यांनी प्रस्तावाच्या नोटिसवर स्वाक्षरी केली आहे.
यामध्ये काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, द्रमुक, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आदी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत धनखड यांच्या वर्तनामुळे सर्वात जास्त गोंधळ होतो. तेच सभागृहातील मोठे गोंधळी आहेत. सभागृहात धनखड सातत्याने सत्ताधारी सदस्यांना बोलण्याची संधी देतात. त्यांचे वर्तन पूर्णपणे पक्षपाती आहे. विरोधी पक्षाने महत्त्वाच्या प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी धुडकावली जाते, त्या वेळी धनखडांना नियमांची आठवण होते. पण, सत्ताधाऱ्यांना बोलण्यासाठी कोणतेही नियम लागू होत नाहीत. विरोधकांना बोलण्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार जाणीवपूर्वक असतो. धनखडांचे निर्णय सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकलेले असतात. सभापती या नात्याने त्यांनी संविधान व संविधानाच्या परंपरांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते’, अशी टीका खर्गे यांनी केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.