खलिस्तानी अमृतपालचा शोध सुरूच

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग यास अटक करण्यात अद्याप यश आलेले नसून त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा अमृतपालच्या अटकेबद्दल संभ्रमाचे वातावरण होते. अमृतपालवरील कारवाईमुळे कायदा-सुव्यवस्था स्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्यात आणि राज्याच्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 03:05 pm
खलिस्तानी अमृतपालचा शोध सुरूच

खलिस्तानी अमृतपालचा शोध सुरूच

पंजाबमधील बंदोबस्तात मोठी वाढ, अमृतपालच्या चार अटक साथीदारांना आसाममध्ये हलवले

#नवी दिल्ली/ अमृतसर

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग यास अटक करण्यात अद्याप यश आलेले नसून त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा अमृतपालच्या अटकेबद्दल संभ्रमाचे वातावरण होते. अमृतपालवरील कारवाईमुळे कायदा-सुव्यवस्था स्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्यात आणि राज्याच्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, अमृतपालच्या चार साथीदारांना आसाममधील दिब्रुगड येथे हलविले आहे. अटक केलेल्या साथीदारांकडून शस्त्र आणि दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी एक मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून शनिवारी रात्री जालंधर येथे एका साथीदाराच्या मोटारसायकलवरून तो पळून जात असल्याचे आढळले होते. आतापर्यंत त्याच्या सात साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दलजीतसिंग कलसी याचा समावेश आहे. त्याला हरयाणातील गुरगावमधून अटक केली असून त्याच्याकडे अमृतपाल सिंग याच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. तसेच अमृतपाल नेतृत्व करत असलेल्या  वारिस पंजाब दे संघटनेच्या अनेकांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अमृतपाल सिंग याच्या वडिलांनाही अटक केली आहे. तसेच अमृतपालच्या अटक केलेल्या चार वरिष्ठ साथीदारांना आसाममधील दिब्रुगढ येथे विमानाने हलविण्यात आले आहे. त्यांना अतिसुरक्षा असलेल्या दिब्रुगढ मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे. जालंधर येथे अमृतपालची कार जप्त करण्यात आली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे आढळून आली. शनिवारी जालंधरच्या शाहकोट तालुक्यात अमृतपाल जात असताना पोलिसांचे एक विशेष पथक त्याच्या मागावर होते. या पथकात सात जिल्ह्यातील पोलिसांचा समावेश होता. भिंद्रनवालेचा अनुयायी असणारा अमृतपाल हा जालंधरमधून  पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला. तो तेथून एका साथीदाराच्या मोटारसायकलवरून जाताना आढळला  होता. अमृतपालच्या साथीदारांनी सोशल मीडियावर काही क्लीप शेअर केल्या आहेत. त्यात पोलीस अमृतपालचा पाठलाग करत असल्याचे म्हटले असून समर्थकांनी शाहकोट येथे जमण्याचे आवाहन केले होते. यानंतर पोलिसांनी राज्यात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोशल मीडियावरून प्रक्षोभक माहिती पसरवली जाऊ नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले असून त्याची मुदत आता सोमवारअखेर वाढवली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपालच्या अटकेसाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी २ मार्च रोजी चर्चा केली होती. त्यावेळी बनवलेल्या योजनेनुसार अमृतपालच्या अटकेची कारवाई शनिवारी सुरू होण्यापूर्वी केंद्राने पंजाबमध्ये अतिरिक्त पोलीस दल पाठवले होते. एका महिन्यापूर्वी अमृतपालचा सहकारी लव्ह प्रितसिंग यास अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी त्याच्या सुटकेसाठी अमृतपालचे साथीदार तलवारी आणि बंदुका घेऊन पोलीस ठाण्यावर चाल करून गेले होते. त्या वेळी उडालेल्या चकमकीत सहा पोलीस जखमी झाले होते. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या हिंसाचाराला अखेर पंजाब पोलीस जबाबदार असल्याचा आरोप अमृतपालने केला होता. त्याच्यावर हिंसाचाराबद्दल एफआयआर दाखल केला आहे की नाही हेही अजून स्पष्ट होत नाही. या घटनेनंतर भाजपने राज्य सरकारला जबाबदार धरले होते. काँग्रेसने अम्रृतपाल आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्याची मागणी केली होती.अमृतपाल सिंग पूर्वी आपल्या कुटुंबाच्या वाहतूक व्यवसायात काम करायचा. पंजाबच्या हक्काचे रक्षण आणि शिखांच्या सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्याकडे वारिस दे पंजाब संघटनेचे नेतृत्व देण्यात आले होते. विघटनवादी खलिस्तान आणि दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा अनुयायी असल्याचा दावा अमृतपाल करायचा. गेल्या काही महिन्यांत त्याने अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली होती. भारतापासून स्वतंत्र होऊन खलिस्तान स्थापन करण्याचा इरादा त्याने अनेक वेळा जाहीर केलेला होता. त्याने अमेरिकास्थित अनिवासी भारतीय किरणदीप कौरशी विवाह केला आहे. सशस्त्र समर्थकांच्या संरक्षणात राज्यभर प्रवास करणाऱ्या अमृतपालला त्याचे समर्थक भिंद्रनवाले -२ या नावाने ओळखत. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांशी त्याचा संबंध असल्याचे सांगण्यात येते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest