‘न्यूयॉर्क टाईम्स’ भारताविषयी खोटेपणा पसरवते
#नवी दिल्ली
काश्मीरमधील वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर भारताने तीव्र आक्षेप घेतला असून केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी न्यूयॉर्क टाईम्सवर जोरदार टीका केली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या संपादकीय पानासमोरील पृष्ठावर प्रसिद्ध झालेला काश्मीरविषयीचा लेख हा खोडसाळ आणि काल्पनिक आहे. तसेच न्यूयॉर्क टाईम्स भारताविषयी जगभर खोटेपणा पसरवित असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे.
अनुराग ठाकूर ट्विटरवर म्हणतात की, भारताविषयी काहीही मजकूर प्रसिद्ध करताना न्यूयॉर्क टाईम्सने वृत्तपत्रांचे नि:ष्पक्ष राहण्याचे संकेत फार पूर्वी मोडलेले आहेत. भारतातील लोकशाही व्यवस्था आणि लोकशाही मूल्याचे रक्षण या विषयी एक विशिष्ट विचार पसरविण्याचे काम न्यूयॉर्क टाईम्स करत आहे. न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य समविचारी प्रसारमाध्यमे भारताविषयी खोटेपणा पसरविण्याचे काम जाणूनबूजून करत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविषयी खोटेपणा पसरविणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र, असा खोटेपणा फार काळ टिकणार नाही.
न्यूयॉर्क टाईम्सच्या ऑप-एड पानावर काश्मीरविषयी एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये काश्मीरमधील माहिती स्वातंत्र्याविषयी विविध निर्बंध असल्याचा दावा केलेला आहे. त्याचा उल्लेख करत ठाकूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, भारत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही वृत्तपत्रांना आकस असल्याचे आढळत आहे. प्रदीर्घ काळापासून हा आकस मनात ठेवून ते भारत आणि मोदी यांच्याविषयी सत्यापासून दूर असलेल्या काल्पनिक माहितीचा प्रसार करत आहेत. एका विशिष्ट वर्गाची बाजू घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे भारतातील बहुमुखी समाजाविषयी एकांगी माहिती पसरत आहे. वृत्तसंंस्था