मुस्लीम विवाह कायदा ठरला अडसर
#तिरुवनंतपूरम
जेव्हा समान नागरी कायद्याबद्दल चर्चा होते तेव्हा मुस्लीम समुदायातील एका वर्गाकडून जोरदार विरोध केला जातो. मात्र, केरळमधील एका मुस्लीम जोडप्याने आपल्या मुलींना हक्क मिळवून देण्यासाठी तब्बल २९ वर्षांनी 'सेक्युलर स्पेशल मॅरेज अॅक्ट' अंतर्गत पुनर्विवाह केला आहे. त्यांच्या मुलींना कायद्यानुसार वारसाहक्काचे पूर्ण अधिकार मिळावेत एवढाच उद्देश होता.
वकील आणि अभिनेता सी शुक्कूर आणि त्याची जोडीदार शीना यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्यांच्या लग्नाची नोंदणी केली. मुली त्यांच्या पालकांच्या लग्नाच्या साक्षीदार आहेत. या जोडप्याने यापूर्वी इस्लामिक शरियत कायद्यानुसार विवाह केला होता. हे प्रकरण केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील आहे. २९ वर्षे विवाहित असलेल्या या जोडप्याने आपल्या तीन मुलींसाठी पुन्हा लग्नगाठ बांधली. शुक्कूरने १९९४ मध्ये डॉ. शीनाशी लग्न केले होते. शरियत कायद्यानुसार हा विवाह झाला. यामुळे त्यांना अनेक अडचणी येत होत्या. मुस्लीम कायद्यानुसार, मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीचा फक्त दोन तृतीयांश भाग मिळतो, बाकीचा भाग त्यांच्या भावांकडे जातो म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या जोडप्याने संपूर्ण मालमत्ता आपल्या मुलींना देण्याचे ठरवले पण शरियत कायदा आड येत होता. कायदेशीर अडथळे टाळण्यासाठी विशेष विवाह कायद्यांतर्गत पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या जोडप्याच्या मालमत्तेचा वारस भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसार लागू होणार आहे.
दरम्यान नवदाम्पत्याने सांगितले की, त्यांना त्यांच्या मालमत्तेची वाटणी होऊ द्यायची नाही. त्यांना आपल्या तीन मुलींना दिवाणी कायद्यानुसार कायदेशीर उत्तराधिकार द्यायचा होता. शुक्कूर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'आमच्या लग्नाची विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी करणे हा एकमेव मार्ग उरला होता, जेणेकरून आमच्या अनुपस्थितीत मुलींना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली आहे.वृत्तसंंस्था