...तर नरेंद्र मोदींना कोणीच रोखू शकणार नाही
#मुर्शिदाबाद
जर राहुल गांधी हे विरोधकांचा पर्यायी चेहरा असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना विजयापासून कोणीच रोखू शकणार नाही, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या मुर्शिदाबाद येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोमवारी ममता बॅनर्जी बोलत होत्या. राहुल गांधी हे मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत.
भाजप आपल्या स्वार्थांसाठी राहुल गांधी यांचा वापर करून त्यांना 'हिरो' करण्याचा प्रयत्न करीत आहे. संसदेचे कामकाज भाजप होऊ देत नाही, कारण त्यांना वाटते की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता बनावेत, असे सांगत ममता यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीतरी सामंजस्य असल्याचेही विधान केले आहे.
देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी मोदींना रोखण्यासाठी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला होता. मोदींविरोधी आघाडी उभारताना काँग्रेसला फारसे महत्त्व न देण्याची भूमिका प्रादेशिक पक्षांनी घेतलेली आहे. याउलट काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी एकत्र यावे, असा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी ही शक्यता फेटाळून लावत भाजपलाच राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी व्हायला हवेत, असे सांगितले आहे.
ममता बॅनर्जींनी भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा आणि माकपा हे अल्पसंख्यांकांना तृणमूल काँग्रेसविरोधी भडकवत आहेत. काँग्रेस भाजपासमोर मान तुकवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने तृणमूलच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर ममता बॅनर्जींनी भाजपा आणि काँग्रेसवर पडद्यामागील युतीचा आरोप केला होता. याआधीही तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील पक्षाचे गटनेते सुदीप बंडोपाध्याय यांनी, राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा राहण्यात भाजपाचा फायदा असल्याचे विधान करून राजकीय वर्तुळात चर्चेला खतपाणी घातले होते.
मोदी आणि ममता ममता करताहेत राहुल गांधींना बदनाम
दरम्यान काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी ममता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा डाव खेळल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जींनी मोदींच्या इशाऱ्यावरच राहुल गांधी यांच्यावर हा आरोप केला असल्याचा दावाही चौधरी यांनी केला आहे. वृत्तसंस्था