म्हणजे मोदींना मारा, अदानी-अंबानी आपसूक मरतील
#जयपूर
सध्या देशभरात सत्ताधारी भाजप आणि देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असे आरोप करत असताना अनेक नेते पातळी सोडून टीका करताना दिसतात. टीका करण्याच्या आवेशात काहीतरी वादग्रस्त विधान करून नव्या वादाला जन्म देत असतात. पंजाब काँग्रेसचे प्रमुख सुखजिंदर रंधावा यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना रंधावा यांनी, अदानी-अंबानींना संपवायचे असेल तर आधी तुम्हाला मोदींना संपवावे लागेल, असे वक्तव्य केले आहे.
राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या नेतृत्वाखाली राजभवन येथे एक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुखजिंदर रंधावा यांनी हे विधान केले आहे. आधी नरेंद्र मोदी यांना संपवा. मोदी संपले की देश आपोआपच सुधारेल. तुम्हाला अदानी आणि अंबानींना संपवायचे असेल तरीही आधी मोदींना संपवावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभक्तीचा अर्थ माहिती नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस नेते तुरुंगात गेले, फाशीची शिक्षा भोगली. मात्र मोदी आणि शाह यांच्या कुटुंबातील कोणीच कधी तुरुंगात गेलेले नाही, असेही रंधावा यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी उद्योगसमूहाला भारताची ईस्ट इंडिया कंपनी बनवून घेऊन आले आहेत. ही कंपनी देशाचे वाटोळे करत सुटली आहे. आम्ही अजून गुलामगिरीकडे वाटचाल करत आहोत. दरम्यान आमची लढाई अंबानी, अदानी यांच्या विरोधात नाही, आम्ही भाजपविरोधात लढतो आहोत, अशी सारवासारव रंधावा यांनी केली आहे.
काँग्रेस माझ्या अंत्यसंस्काराची तयारी करते आहे
दरम्यान पंजाब काँग्रेसचे प्रमुख सुखजिंदर रंधावा यांच्या या विधानावरून आता गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रंधावा यांच्या विधानावर भाजपकडून अजून कसली प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र रंधावा यांच्या विधानापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलोर-म्हैसूर एक्स्प्रेसवेचे उद्घाटन करताना, काँग्रेसचे नेते माझ्या अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले असून मी गोरगरिबांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त असल्याचे विधान केले होते. वृत्तसंस्था