‘स्लीपर घालणारे हवाई प्रवास करतील’
#शिवमोग्गा
हवाई चप्पल (स्लीपर) घालणाऱ्यांनी आता हवाई प्रवास केला पाहिजे. हे परिवर्तन घडताना मी पाहात आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले. हवाई वाहतुकीचा व्यवसाय वेगाने वाढत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतरच्या सभेत ते बोलत होते. कर्नाटक विधानसभेची निवडणूक मे मध्ये होत असून गेल्या काही काळात मोदी यांनी राज्याला दिलेली ही पाचवी भेट आहे.
नजीकच्या भविष्यात देशाला हजारो विमाने लागणार असून भारतात बनवल्या जाणाऱ्या विमानातून आपण देशवासीय अन्य देशांतील नागरिक प्रवास करत आहेत हे पाहण्याचे दिवस लांब राहिलेले नाहीत, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा सोमवारी वाढदिवस होता. त्यांच्या गावाला भेट देत असलेल्या पंतप्रधानांनी त्यांचे विशेष अभिनदन केले. या विमानतळामागची कल्पना आणि पाठपुरावा करणाऱ्या येडीयुरप्पा यांनी विधानसभेत आमदार म्हणून केलेल्या अखेरच्या भाषणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या अखेरच्या भाषणाकडे तरुण राजकीय नेत्यांनी प्रेरणेचा स्रोत म्हणून पाहिले पाहिजे. येडीयुरप्पांचा वाढदिवस सर्वांच्या स्मृतीत राहावा यासाठी उपस्थितांना मोबाईलमधील टॉर्च चालू करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन अशावेळी होत आहे, ज्यावेळी एअर इंडियाने विमान खरेदीचा मोठा करार केला आहे. यामुळे विकासाची प्रगतीची दारे तर उघडतील, शिवाय रोजगार मोठ्या प्रमाणावर वाढेल असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, २०१४ पूर्वी भारताकडे ७३ विमानतळे होती. त्यानंतर भाजपाने आणखी ७३ विमानतळे बांधली आहेत. डबल इंजिन सरकारने विकासाचा वेगही डबल केला आहे. विमानतळाच्या उद्घाटनाबरोबर जवळच्या सोगाने येथे ३ हजार ६०० कोटींच्या प्रकल्पाचे मोदींनी उद्घाटन केले. नवे विमानतळ साडेचारशे कोटी खर्चून उभारले आहे. पॅसेंजर टर्मिनलची तासाला तीनशे प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.
वृत्तसंंस्था