आरएसएस, मुस्लीम ब्रदरहूड सारखेच
#नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये असून तिथल्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनचे कौतुक करणाऱ्या राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि मुस्लीम ब्रदरहूडची तुलना केली आहे, तसेच संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपसोबतच इतर अनेक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना तिची इजिप्तमधली कट्टर संघटना मुस्लीम ब्रदरहुडसोबत तुलना केली आहे. इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूडची स्थापना ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणेच संघाची स्थापना झाली. लंडनमधल्या थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी हे उदाहरण दिले. आरएसएस ही कट्टर आणि फॅसिस्ट संघटना आहे. या संघटनेने भारतातल्या काही संस्थांवरही कब्जा केला आहे. भारतात या संघटनेकडून असा प्रचार केला जातो आहे की, भाजपाला कुणी हरवू शकत नाही, असेही ते म्हणाले आहेत. याशिवाय राहुल गांधी यांनी संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा दावा केला आहे. बोलताना विरोधकांचे माईक बंद केले जातात, असा दावा त्यांनी केला आहे.
वृत्तसंंस्था