पोपट विकणे यूट्यूबरला महागात
#नवी दिल्ली
सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन आणि विचित्र अशी प्रकरणे समोर येत असतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. आसाममधील एका यूट्यूबरला त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोपट विकण्याची जाहिरात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण आसाममधील कोक्राझार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. 'पेटा' अंतर्गत यूट्यूबर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कचुगाव विभागीय वन अधिकारी भानू सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिदुल इस्लाम नावाच्या यूट्यूबरला त्याच्या यूट्यूब चॅनेलवर पोपट विकण्याची जाहिरात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला गोसाईगाव पोलिसांनी पकडून नंतर वनविभागाच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले.आरोपीला पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्सच्या (पेटा) तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. तक्रार मिळाल्यानंतर आमच्या विभागाने स्थानिक पोलिसांसह त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि पोलिसांनी त्याला शुक्रवारी गोसाईगाव येथून अटक करून दुसऱ्या दिवशी आमच्या ताब्यात दिल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा
पोपटांना पकडणे आणि खरेदी करणे, त्यांची विक्री करणे , पिंजऱ्यात ठेवणे या कृती बेकायदेशीर आहेत. यामध्ये गुन्हेगारांना तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५,००० रुपयांचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वृत्तसंस्था