राहुल गांधींनाही मिळणार मोफत घरकुल?
#छिंदवाडा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे बेघर असतील, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरासाठी एक अर्ज भरून द्यावा, आपण केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एक घरकुल त्यांनाही देऊन टाकू, असे आश्वासन केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींना दिले आहे. छत्तीसगडमधील रायपूरच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी आपण ५२ वर्षांचे असूनही बेघर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना घरकुल योजनेतून घर देण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसच्या रायपूर येथील अधिवेशनात राहुल गांधी यांनी, आपल्याकडे स्वतःच्या मालकीचे घर नसल्याचे विधान केले होते. आपले वय ५२ वर्षे आहे, मात्र अद्याप नावावर स्वतःचे निवासस्थान नसल्याचे त्यांनी सांगितले होते. रविवारी छिंदवाडा येथील घरकुल योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिरीराज यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी खासदार आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या आईचे निवासस्थान आहे. आजीचे निवासस्थान आहे. तरीही ते म्हणतात की ते बेघर आहेत. राहुल गांधी असा दुटप्पीपणा का करतात? आता त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करावा, त्यांनाही एक घरकुल देऊन टाकू.वृत्तसंंस्था