पुलवामा विधवांच्या आंदोलनास जयपूरमध्ये हिंसक वळण
#जयपूर
पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या विधवांच्या नोकरी आणि अन्य मागण्यांसाठी सुरू झालेल्या आंदोलनास शनिवारी हिंसक वळण लागले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी निघालेल्या निदर्शकांना अडवण्यात आल्यावर त्याला हिंसक वळण लागले. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि बॅरीकेड उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
याच प्रश्नी शुक्रवारी आंदोलन करणारे भाजप नेते किरोडी लाल मीना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राजकीय फायद्यासाठी मीना हे जवानांच्या विधवांचा वापर करून घेत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला होता. दरम्यान, पोलीस आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मीना यांनी केला होता.
या प्रश्नी गेले दोन आठवडे निदर्शने केली जात असून त्याचे नेतृत्व पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या विधवा करत आहेत. कुटुंबातील एकास नोकरी आणि अन्य काही मागण्यांसाठी निदर्शक आग्रही आहेत. सचिन पायलट यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करणाऱ्या विधवांना शुक्रवारी हलविण्यात आले असून विधवांना त्यांच्या घराजवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत यांनी यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या विधवांची भेट घेतली. या वेळी त्यांनी केवळ आपल्या मुलांना नोकरी मिळावी अशी मागणी केली. मात्र, गेहलोत यांना पुलवामातील जवानांच्या विधवा भेटल्या नाहीत. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या प्रश्नी राजकारण सुरू केले असून सरकार शहिदांच्या विधवांचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे.
या प्रश्नी टोंक येथे सचिन पायलट म्हणाले की, हा संवेदनशील प्रश्न असून आम्ही तो व्यवस्थित हाताळू. शहिदांच्या गावी रस्ते, पुतळे रस्ता बांधणी, घरांचे वाटप हे प्रश्न सोडवता येतील. शहिदांच्या विधवांच्या प्रश्नावर चर्चा करण्यास आम्ही तयार नाही, हा संदेश जनतेत जाणे चुकीचे ठरेल. आपला अहंकार बाजूला ठेवल्यास प्रश्न सुटू शकतो.