निदर्शने करणाऱ्या विरोधी आमदारांची उचलबांगडी
#थिरुअनंतपुरम
विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयासमोर विरोधी पक्षाचे आमदार निदर्शने करत असल्यामुळे गोंधळाचे वातावरण बुधवारी पाहावयास मिळाले. विरोधी आमदारांना सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीने उचलून बाहेर नेत निदर्शनाची जागा मोकळी केली. या वेळी झटापटीत चार आमदार जखमी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.
काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष ए.एन.शमशीर यांच्या कार्यालयासमोर धरणे धरली होती. त्यांनी जेव्हा जागा सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांना जबरदस्तीने हलविण्यात आले. विरोधी पक्षनेते व्ही.डी. सथीसन म्हणाले की, या वेळी उडालेल्या झटपटीत रेमा, ए.के. अश्रफ, टी.व्ही.इब्राहीम आणि सानीश कुमार हे चार आमदार जखमी झाले आहेत. विरोधी सदस्यांचा लोकशाही हक्क सभागृहात सातत्याने नाकारला जात आहे. एक अल्पवयीन मुलीवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा प्रश्न विरोधी सदस्यांनी तहकुबी सूचनेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही नोटीस स्वीकारण्यास अध्यक्षांनी कोणत्याही वैद्य कारणांशिवाय नकार दिला. ज्येष्ठ सदस्य आणि माजी गृहमंत्री थिरुवनचूर राधाकृष्णन यांना ढकलण्यात आले. आमदार के.के.रेमा यांचा हात पिरगळण्यात आला. त्यांना चार-पाच महिला मार्शलनी जमीनीवर ढकलून दिले.
सथीसन म्हणाले की, मुख्यमंत्री पिनारी विजयन यांच्या दबावाखाली अध्यक्ष ए.एन.शमशीर हे पक्षपातीपणाने काम करत आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मुख्यमंत्री घाबरत असून त्यांना हे अधिवेशन लवकरात लवकर गुंंडाळायचे आहे. महिलांच्या सुरक्षेबाबतची तहकुबी सूचना चर्चेला घेण्यास नकार दिल्याने विरोधी आमदार संतप्त झाले होते. कोची येथील डम्प यार्ड लागलेल्या आगीच्या निषेधार्थ तेथील कॉग्रेस नगरसेविकेने निदर्शने केली. या निदर्शकांवर पोलीस कारवाई केल्याचा प्रश्नही उपस्थित करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. महिला सुरक्षेच्या तहकुबीवर चर्चा होणार नसल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले तेव्हा विरोधकांनी सभागृहात घोषणा देत फलक झळकावले. त्यानंतर सभात्याग करत त्यांनी अध्यक्षांच्या कायार्लयासमोर धरणे धरली. वृत्तसंस्था