परीक्षा केंद्रात हिजाब घालण्यास मनाई
#बंगळुरू
प्री-विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या परीक्षेत हिजाब घालण्यास परवानगी नसल्याचे आदेश कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिले आहेत. त्यांचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. होळीच्या सुटीनंतर या विषयावर सुनावणी होणार आहे.
दुसरी पीयूसी परीक्षा ९ मार्चपासून सुरू होत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश घालूनच यावे लागणार आहे. हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था आणि शासन नियमानुसार चालतात, असे नागेश यांनी सांगितले. परीक्षा केंद्रात हिजाबवर बंदी घातल्यानंतर परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, त्याची आकडेवारी त्यांनी शेअर केलेली नाही. नागेश म्हणाले, हिजाब बंदीनंतर अधिक मुस्लीम मुली परीक्षा देण्यासाठी येत आहेत. अधिक मुस्लीम मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
हिजाब बंदीविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला होता. न्यायालयात तातडीने सुनावणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी ९ तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे, त्यामुळेच त्यावर तत्काळ सुनावणी करावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. यावर न्यायालयाने तुम्ही शेवटच्या दिवशी आला आहात. होळीच्या सुटीनंतर सुनावणी होणार आहे, असे स्पष्ट केले आहे.वृत्तसंंस्था