झोमॅटोला दिली १४ वेळा भांगेची ऑर्डर!
#नवी दिल्ली
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हीडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यात आपल्या देशाच्या वैविध्यतेचे दर्शन घडत असते. होळी आहे आणि सोशल मीडियावर त्याचे रंग उधळले जाणार नाही असे काही होणार नाही. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका ट्वीटनेही अनेकांना धक्का बसला आहे. देशभर खाद्य पदार्थांची देवाण-घेवाण करून अल्पावधीत आघाडी प्राप्त करणाऱ्या झोमॅटोने एक ट्वीट शेअर केले असून ते वाचून प्रत्येकाला काही ना काही प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. सामान्य लोकांबरोबर दिल्ली पोलिसांनाही या ट्वीटवर प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.
झोमॅटोच्या ट्वीटमध्ये असे काय आहे ते आता आपण पाहू या. शुभम नावाच्या तरुणाने होळीच्या दिवशी झोमॅटोकडे अशी काही मागणी केली की त्यांना त्यावर कसे रिॲक्ट व्हावे हे सूचेना. आता शुभमच्या जगावेगळ्या मागणीबाबत झोमॅटो काय म्हणते ते ते पाहा. ते म्हणतात की, शुभम नावाचा तरुण गुरगावमध्ये राहत असून तो आमच्याकडे भांगेच्या गोळीचा मागणी करत आहे. त्याला आता कोणीतरी समजावून सांगा की झोमॅटो भांगेच्या गोळ्यांची मागणी पूर्ण करू शकत नाही. त्याने ही मागणी एक-दोनवेळा नव्हे तर तब्बल चौदा वेळा केली आहे. झोमॅटोच्या ट्विटनंतर लोकांनी आपापल्या पद्धतीने मते व्यक्त केली आहेत. यातील काहीजणांनी विलंबाने होणाऱ्या डिलीव्हरीवर आपला संताप व्यक्त केला आहे तर काही म्हणतात याला म्हणजे भांगेला मोठी मागणी दिसते. या गोळ्या झोमॅटोने मोफत दिल्या पाहिजेत. यावर दिल्ली पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया सगळ्यात मजेशीर होती. दिल्ली पोलीस म्हणतात, कोणी जर शुभमची भेट घेणार असेल तर त्याला सांगा भांगेची गोळी घेतल्यानंतर गाडी चालवू नका. खरं तर दिल्ली पोलीस लोकांमधील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने संवादाची भाषा बदलत आहेत. त्यामुळे छोटे-छोटे गुन्हे असोत की मोठ्या गुन्हेगारीच्या घटना असोत, पोलीस आपली बाजू विनोदी किंवा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. लोकांना पोलिसांची भीती तर वाटू नये मात्र, पोलिसांना काय म्हणायचे आहे ते त्यांच्या पर्यंत पोहचेल, असा त्यांचा प्रयत्न आहे. वृत्तसंंस्था