मोदींच्या विरोधात विरोधकांचे एक दिवसीय उपोषण
#नवी दिल्ली
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीने आता त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात राजधानीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांनी देशभरातील १८ विरोधी पक्षांना या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा उल्लेख केला की मोदी सरकार प्रादेशिक पक्षांच्या, विरोधकांची चौकशी सुरू करते. त्यासाठी तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातो. मात्र भाजपला विरोधकांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच भारत राष्ट्र समितीने सर्व विरोधी पक्षांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात राजधानीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. कविता यांच्या भारत जागृती मंचतर्फे हे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन सर्वच विरोधी पक्षांना करण्यात आले आहे. शुक्रवारी दिल्लीत ६ हजारांहून अधिक लोक या उपोषणात सहभागी होतील. याबाबत आपण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संवाद साधला आहे, काँग्रेसचे प्रतिनिधी या उपोषणात सहभागी होणार आहेत.
वृत्तसंंस्था