जर्मनीच्या ताब्यातील मुलीच्या सुटकेसाठी मोदींनी हस्तक्षेप करावा
#मुंबई
जर्मनीमध्ये अटकेत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीच्या सुटकेसाठी एक भारतीय दाम्पत्य मायदेशात दाखल झाले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या कामी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. या दाम्पत्यांची तीन वर्षांची मुलगी गेले दीड वर्षे जर्मनीत कोठडीमध्ये आहे. पत्रकार परिषदेत या मुलीची आई म्हणाली की, जर्मनीतील बाल सेवा विभागाने सप्टेंबर २०२१ मध्ये आमच्या मुलीचा ताबा घेतला. अपघातामध्ये तिच्या शरीरातील गुप्त भागास दुखापत झाल्याने आम्ही तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तिला काही झाले नसल्याचे सांगून आम्हाला परत पाठवले. फेरतपासणीसाठी आम्ही गेलो असता डॉक्टरांनी ती ठणठणीत असल्याचे सांगितले.
मात्र यावेळी डॉक्टरांनी तेथील बाल सेवा विभागाला बोलावले. मुलीच्या जखमेच्या स्वरूपामुळे त्यांना लैंगिक शोषणाची शंका आली असे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही शंका राहू नये म्हणून डीएनए टेस्ट दिली. डीएनए टेस्ट, पोलीस चौकशी, वैद्यकीय अहवालानंतर लैंगिक शोषणाची फिर्याद फेब्रुवारी २०२२ मध्ये मागे घेतली. हे प्रकरण आता संपले आणि मुलगी ताब्यात मिळेल असे वाटत असताना तेथील बाल सेवा विभागाने पुन्हा आमच्याविरुद्ध तक्रार केली. कोर्टाच्या आदेशानुसार वर्षभरात आम्ही १५० पानांचा पालक सक्षमता अहवाल दिला. अहवालात मुलगी आणि पालकांचे नाते बळकट असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र, पालकांना मुलीचे संगोपन कसे करायचे हे माहीत नसल्याने मुलगी ३ ते ६ वर्षांची होईपर्यंत आम्ही एका कुटुंबात राहावे असे सांगण्यात आले. त्यानंतर मुलगीच ठरवेल की तिला कोठे राहायचे आहे. आम्हाला तिला भारतात आणायचे आहे, मात्र, त्याला कोर्ट नकार देत आहे. सांस्कृतिक दरीमुळे आम्ही त्यांना समजावून सांगू शकत नाही. यामुळे मुलीला भारतात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे. त्यांनी लक्ष घातले तर मुलगी मायदेशी येऊ शकेल.
हे प्रकरण सुरू असताना मुलीच्या वडिलांची तेथील नोकरीही मंदीमुळे संपुष्टात आली. या अडचणीच्या काळात आम्हाला चाळीस लाखांचे कर्ज झाले. यामुळे मुलीसह आम्ही मायदेशी परतण्याचे ठरवले. मात्र, तेथील कोर्ट आणि कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य होत नसल्याने आम्ही हतबल झाल्याचे या दाम्पत्याने सांगितले.
वृत्तसंंस्था