जिनांचे अनेक वारसदार अजूनही भारतात
#नवी दिल्ली
पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना तर पाकिस्तानात गेले मात्र त्यांचे अनेक वारसदार आजही भारतात वास्तव्यास आहेत. हे वारसदार जेव्हा तोंड उघडतात, विषारी गरळ ओकत असतात, अशा शब्दांत गुरुवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
झारखंडमध्ये महाशिवरात्री महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. पलामू येथे मशीद आणि मंदिराजवळ महोत्सव साजरा करण्यावरून दोन गटात हिंसाचार झाला. हा हिंसाचार रोखण्यात झारखंड सरकारला अपयश आल्याचे विधान करताना झालेल्या हिंसाचारासाठी एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरत संघ आणि भाजपवर टीका केली होती. झारखंड सरकारला हा हिंसाचार रोखता आला असता. मात्र संघानेच हा हिंसाचार घडवून आणला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना गुरुवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुस्लीम समाजाची वाढती लोकसंख्या हा माझ्यासाठी चिंतेचा विषय नाही. मात्र जिना यांचे अनुकरण करणारे लोक हा चिंतेचा विषय आहे. मुस्लीम समाजाला चुकीच्या दिशेने नेणारे जिना तर या देशातून निघून गेले, मात्र त्यांचे अनेक वारसदार आजही या देशात वास्तव्यास आहेत, जे मुस्लीम समाजाची दिशाभूल करत आहेत. एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे ज्यावेळी बोलतात, त्यावेळी भाषणातून गरळ ओकत असतात. यांच्या तोंडी केवळ विखारी विचारच येत असतात. जिना यांच्या पावलांवर पावूल टाकत हिंदू-मुस्लीम द्वेष निर्माण करणारे ओवेसी यांच्यासारखे नेते हा चिंतेचा विषय आहे. कारण आजपर्यंत हिंदूंनी कुठेच कुठल्याच मशिदीवर दगड भिरकावलेला नाही, असेही गिरीराज सिंह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे दोन्ही नेते वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजप नेते आणि ओवेसी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. कर्नाटक भाजपचे नेते विनयकुमार कटील यांनी टिपू सुलतान यांच्या नावाचा गजर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना गुरुवारी ओवेसी यांनी भाजपवर टीका केली आहे. मी टीपू सुलतानचे नाव वारंवार घेईन, तुम्ही काय करता ते बघतोच, अशी संतप्त प्रतिक्रिया असदुद्दीन ओवेसी यांनी दिली. तसेच कर्नाटक भाजप अध्यक्षांच्या विधानाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का ? भाजप कटील यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.