विमानातील धूम्रपानाबद्दल बंगळुरूमध्ये एकाला अटक
#बंगळुरू
इंडिगो विमानातून प्रवास करत असताना टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्याच्या आरोपाखाली एका प्रवाशाला केम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रवाशाचे नाव शेषहरी चौधरी असे आहे.
आसाममधून बंगळुरूकडे येताना त्याने इंडिगोच्या ६इ ७१६ या फ्लाईटमधून विमान प्रवास केला होता. या प्रवासात त्याने विमानाच्या टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्याचा आरोप आहे. विमानातील कर्मचाऱ्यांना धुराचा वास आल्याने त्यांनी ही बाब कॅप्टनच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तत्काळ ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. विमान हवेत असतानाच धूम्रपान केल्याने विमानाला धोका निर्माण झाला असता. तसेच त्यामुळे अन्य प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते.
विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यावर तातडीने कारवाई करून शेषहरी चौधरीस अटक केली. शुक्रवारी पहाटे दीड वाजता त्याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. विमानतळ प्रशासन त्याची चौकशी करत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक २४ वर्षांची तरुणी इंडिगोच्या विमानात धूम्रपान करताना आढळली होती. ती इंडिगोच्या फ्लाईटने कोलकाता येथून बंगळुरू येथे येत होती. विमान बंगळुरूमध्ये दाखल झाल्यावर तिला लगेच अटक करण्यात आली. चौकशीनंतर तिला जामिनीवार सोडण्यात आले आहे.
वृत्तसंस्था