खंडणीसाठी पोलिसांचं काय पण!

खंडणीसाठी पोलीस कोणत्या थराला पोचू शकतात, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. तरुणाच्या बॅगेत स्वत:च गांजा ठेवून त्याच्याकडून दोन पोलीस कॉन्स्टेबलनी खंडणी उकळली. अखेर या दोघा कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Tue, 17 Jan 2023
  • 04:22 pm

पोलिस खंडणी

पैसे उकळण्यासाठी तरुणाच्या बॅगेत ठेवला गांजा; बंगळुरूतील धक्कादायक घटना

#बंगळुरू

खंडणीसाठी पोलीस कोणत्या थराला पोचू शकतात, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. तरुणाच्या बॅगेत स्वत:च गांजा ठेवून त्याच्याकडून दोन पोलीस कॉन्स्टेबलनी खंडणी उकळली. अखेर या दोघा कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.  

याबाबत पोलीस उपायुक्त सी. के. बाबा म्हणाले की, दोन्ही कॉन्स्टेबलच्या विरोधातील चौकशी पूर्ण झाली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन्ही कॉन्स्टेबलनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

हिमाचल प्रदेशमधील वैभव पाटील या तरुणाकडून या पोलिसांनी खंडणी उकळली होती. पाटील हा खासगी कंपनीत काम करीत होता. त्याला महिन्याला २२ हजार रुपये वेतन होते. एक दिवस तो दुचाकीवरून घरी जात असताना दोन पोलिसांनी त्याला अडवले. त्यांनी त्याची बॅग काढून घेतली. गांजा ओढला आहेस का, अशी विचारणी त्यांनी केली. यावर वैभवने नकार दिला.

त्यानंतर पोलिसांनी वैभवच्या बॅगेची तपासणी सुरू केली. तपासणी करण्याच्या बहाण्याने त्यांनी स्वत:च वैभवच्या बॅगेत गांजा टाकला. नंतर बॅगेत गांजा सापडल्याचे दाखवत वैभवला धमकावण्यास सुरुवात केली. त्याला अटक करण्याची धमकीही त्यांनी दिली. त्यांनी वैभवकडे असलेले अडीच हजार रुपये काढून घेतले. वैभवकडे घरी जाण्यासाठी पैसे नसल्याने वैभवने पोलिसांकडे १०० रुपये मागितले. परंतु, त्यांनी १०० रुपयेही देण्यास नकार देऊन त्याला तेथून हाकलून लावले.

उपायुक्त बाबा यांनी दोन्ही पोलिसांच्या विरोधात खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले. बंडेपाल्या पोलिसांनी वैभवचा जबाब मागील शुक्रवारी नोंदवला. त्याने खंडणी उकळणाऱ्या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलना ओळखले. त्याने तोंडी व लेखी जबाब पोलिसांसमोर दिला. दुसऱ्या दिवशी तो दोन्ही कॉन्स्टेबलच्या चौकशीसाठीही हजर राहिला.

 

न्याय मिळताच ट्विट काढून टाकली   

सुरुवातीला दोन्ही पोलिसांनी वैभवकडून पैसे घेतल्याचा इन्कार केला. वैभव तपासणी करण्यास नकार देत होता, असे त्यांनी सांगितले. परंतु, गांजा सापडल्याचे दाखवत दोघांनी कशाप्रकारे पैसे घेऊन आपल्याला जाऊ दिले, हे पुन्हा सांगितले. या प्रकरणामुळे त्याचे पालक चिंतित असून, त्यांनी हिमाचल प्रदेशला परतण्यास सांगितल्याचेही वैभवने स्पष्ट केले. अखेर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर वैभवने या प्रकाराबाबतची सगळी ट्विट काढून टाकली आहेत.

 

ट्विटनंतर फिरली चौकशीची चक्रे

वैभवने या घटनेनंतर अनेक ट्विट करीत आपल्यावरील अन्याय सोशल मीडियावर मांडला. त्यांनी यात बंगळुरूचे पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी यांनाही टॅग केले होते. पोलिसांनी मुद्दामहून गांजाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटले होते. यावर उपायुक्त बाबा यांनी वैभवला कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वैभवला कोणतीही अडचण आल्यास थेट आपल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगत उपायुक्तांनी त्याला आश्वस्त केले.

आयएएनएस

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest