Dog
#हैदराबाद
स्विगीची फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने कुत्र्याच्या भीतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
मोहम्मद रिझवान (वय २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिझवान हा स्विगीमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करीत होता. तो बंजारा हिल्समधील लुंबिनी कॅसल इमारतीत फूड डिलिव्हरीसाठी ११ जानेवारीला गेला होता. त्याने ऑर्डर देण्यासाठी सदनिकेचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी सदनिकेतून एक जर्मन शेफर्ड कुत्रा त्याच्या अंगावर आला.
रिझवानने कुत्र्यापासून वाचण्यासाठी तिथून धाव घेतली. त्याने घाबरून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला होता. सदनिकेच्या मालक शोभना यांनी रुग्णवाहिका बोलावली. त्याला तातडीने निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, रविवारी (ता. १५) रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रिझवानच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली असून, कुत्र्याच्या मालकिणीवर कारवाईची मागणी केली आहे. सुरुवातीला कुत्र्याच्या मालकिणीने उपचाराचा संपूर्ण खर्च देण्याची तयारी दाखवली होती. नंतर तिने रिझवानच्या कुटुंबीयांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. कुत्र्याला बांधून न ठेवता रिझवानच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
आयएएनएस