कर्नाटकात 'इमोशनल अत्याचार'
#बंगळुरू
भारतातील निवडणुका नेहमीच भावनिक मुद्यांवरून लढवल्या जातात. प्रचारमोहिमांत भावनिक आवाहन करून, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करत असतात. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीतही असेच चित्र असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मराठी-कानडी वादाचे भावनिक राजकारण करत असताना काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनीही इमोशनल कार्ड खेळायला सुरुवात केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच महिने शिल्लक उरले आहेत. काँग्रेस-भाजप आणि जेडीएससह सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारात महागाई, बेरोजगारी, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या असे कुठलेच मुद्दे आलेले दिसत नाहीत. सर्वच पक्षांचे नेते भावनिक मुद्द्यांना हात घालत जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. काँग्रेस नेते आणि
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इमोशनल कार्ड खेळत, ही माझी शेवटची निवडणूक असेल, असे सांगायला सुरुवात केली आहे.
रविवारी बिदरमध्ये बोलताना, ही माझी शेवटचीच निवडणूक असेल. मात्र, मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. निवृत्तीनंतरही मी तुम्हा सर्वांना साथ देईन. कर्नाटकातील जनतेच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. देवराज उर्स यांच्यानंतर पाच वर्षे सेवा करणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या 'प्रजा द्वानी यात्रे'दरम्यान सभेला संबोधित करताना सिद्धरामय्या यांनी, 'सत्तेत आल्यास आम्ही १० किलो तांदूळ, २०० युनिट मोफत वीज आणि महिलांच्या नेतृत्वाखालील घरांना २ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.