चीनच्या सीमेवर राहुल गांधींनी नव्हे तर पंतप्रधानांनी सैन्य पाठवले
#नवी दिल्ली
चीनच्या सीमा प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जोरदार टीका केली आहे. सीमेवर चीनने सैनिक तैनात केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य पाठवले होते असे सांगत १९६२ ला नेमके काय झाले याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
एका मुलाखतीत जयशंकर म्हणतात की, सीमेवरील मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी मोदी यांनी निधीमध्ये पाचपट वाढ केली आहे. पॅगॉंग तलावाच्या परिसरात चीनने पूल बांधल्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्ष सातत्याने टीका करत असले तरी हा भाग १९६२ पासून चीनच्या बेकायदेशीर ताब्यात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
चीन सीमाप्रश्नी काँग्रेस सातत्याने सरकारवर टीका करत असल्याने त्याला जोरदार उत्तर देताना ते म्हणाले की, चीनमधील ची या पहिल्या शब्दापासून सुरू होणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल काँग्रेस नेत्यांना काही ॲलर्जी असल्याचे दिसते. चीनबरोबरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कधीपासून अस्तित्वात आली? काँग्रेस नेते जाणूनबुजून चीन सीमेबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. १९५८ मध्ये चीनने तेथे प्रथम प्रवेश केला. त्यानंतर १९६२ मध्ये त्यांनी तो भाग बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला. आता तेथे चीनने पूल बांधला तर तुम्ही २०२३ त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरणे कितपत संयुक्तिक आहे.? वृत्तसंंस्था