संग्रहित छायाचित्र
आज १५ जानेवारी २०२५ रोजी भारतीय सैन्य आपला ७७ वा सैन्य दिन साजरा करत आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्य कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या सैन्य दिनाच्या निमित्ताने आपण भारतीय सैन्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींची थोडक्यात माहिती करून घेऊया.
आज १५ जानेवारी, भारतीय सैन्य दिवस . १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के.एम. करिअप्पा यांनी पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. स्वातंत्र्यानंतर एका भारतीय व्यक्तीने भारतीय लष्कराचे नेतृत्व करण्याची ती पहिलीच वेळ होती. भारतीय सैन्याच्या इतिहासात तो एक महत्त्वाचा क्षण होता. तेव्हापासून भारतीय सैन्य दिवस हा १५ जानेवारीला साजरा केला जातो.
भारतीय सैन्याची स्थापना १ एप्रिल १८९५ रोजी झाली. भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक युद्धे लढली. १९४८, १९६५, १९७१, तसेच कारगिल पाकिस्तानविरुद्ध तर १९६२ मध्ये चीनविरुद्ध भारतीय सैन्य शौर्याने लढले.
भारतीय सैन्य हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्य आहे. भारतीय सैन्यात एकूण २७ इन्फंट्री रेजिमेंट आहेत. सैन्य एकूण ४० विभाग आणि १४ कॉर्प्समध्ये विभागलं गेलं आहे. तसेच भारतीय सैन्यात एकूण १४ लाखांपेक्षा अधिक सक्रिय सैनिक आहेत.