संग्रहित छायाचित्र
प्रयागराज, भारतातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र. हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या दुर्मीळ अशा महाकुंभ मेळ्याची सुरुवात प्रयागराजमध्ये आजपासून झाली आहे. गंगा, यमुना और सरस्वती या नद्यांच्या संगमावर १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी महाकुंभ मेळा हा हिंदूचा धार्मिक उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु या वर्षीचा कुंभमेळा हा निव्वळ कुंभमेळा नसून तो महाकुंभमेळा आहे. १४४ वर्षातून एकदा येणारा हा एक दुर्मीळ क्षण आहे. दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा असं कुंभमेळ्याचं वर्णन केलं जातं. दर बारा वर्षांनी हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. कोट्यवधी भाविक या मेळ्यामध्ये श्रद्धापूर्वक सहभागी होत असतात.
कुंभमेळ्याचा उगम
समुद्रमंथनाच्या पौराणिक घटनेतून कुंभमेळ्याचा उगम झाल्याचे हिंदू धर्मात मानले जाते. अमर होण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. या समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ म्हणजे घडा बाहेर आला. मात्र या अमृतावर हक्क कुणाचा यावरून देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला. दानवांच्या हातातून अमृत वाचवण्यासाठी इंद्र देवाचे पुत्र जयंत याने तो अमृताचा कुंभ चंद्र देवाकडे दिला. चंद्रदेवतेकडून अमृताचे काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन इथं सांडले, अशी मान्यता आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणांना हिंदू धर्मात पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. मुक्तीसाठी आणि पापाचा नाश करण्यासाठी हिंदू लोक श्रद्धेने या ठिकाणी जाऊ लागली.
कुंभमेळा आणि महाकुंभमेळा यांच्यातील फरक
दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि यंदाचा कुंभमेळा यात एक महत्त्वाचा फरक आहे. प्रयागराज येथे यंदा महाकुंभ मेळा भरला आहे. जेव्हा १२ कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभ मेळा साजरा केला जातो. २०२५ ला प्रयागराज येथे १४४ वर्षांनी आलेला कुंभमेळा हा महाकुंभ मेळा भरला आहे. त्यामुळे या कुंभ मेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यंदा २०२५ साली १४४ वर्षांनंतर सूर्य, चंद्र, शनी आणि बृहस्पती या चार ग्रहांची एकाच रेषेत विशेष ग्रहस्थिती निर्माण झाली आहे. ग्रहांच्या स्थितीचा हा विशेष योग आहे. त्यामुळे २०२५ मधील हा महाकुंभ गेल्या १४४ वर्षांमधील सर्वात शुभ महाकुंभ मानला जातोय. या वर्षी प्रयागराज येथील महाकुंभमध्ये सुमारे ४० ते ४५ कोटी भक्त सहभागी होतील असा अंदाज लावला जात आहे. एकूण ४४ दिवस हा महाकुंभ चालणार आहे. या उत्सवात भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक विधी आणि स्नान करणार आहे.
अमृत स्नानाची परंपरा
कुंभमेळ्यात अमृत स्नानाच्या परंपरेला विशेष महत्त्व आहे. नागा साधूंच्या धार्मिक निष्ठेमुळं या अमृत स्नानाच्या तिथिंना सर्वप्रथम त्यांना स्नान करण्याची संधी मिळते. हत्ती, घोडे तसेच रथावर आरुढ होऊन हे नागा साधू कुंभमेळ्यात येतात आणि थाटामाटात स्नान करतात. म्हणूनच या या अमृत स्नानाला शाही स्नान असं देखील म्हटलं जातं. १३ जानेवारी पौष पौर्णिमा, १४ जानेवारी मकर संक्रांत, २९ जानेवारी मौनी अमावस्या, ३ फेब्रुवारी वसंत पंचमी, १२ फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि २६ फेब्रुवारी महाशिवरात्री या तारखांना अमृत स्नानाच्या तिथी आहेत. या दिवशी लाखो हिंदू भाविक प्रयागराज येथील गंगा, यमुना और सरस्वती या नद्यांच्या संगमावर अमृतस्नान करून मोक्षप्राप्ती साठी प्रार्थना करतील. अमृत स्नान हे कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण असतं.