Dollar vs Rupee | चिंताजनक...! अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपया नीचांकी पातळीवर...

आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज 13 जानेवारी रोजी रुपया त्याच्या सर्वकालीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 03:30 pm
Dollar vs Rupee,

प्रातिनिधिक छायाचित्र....

Dollar vs Rupee | आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज 13 जानेवारी रोजी रुपया त्याच्या सर्वकालीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 27 पैशांनी घसरून 86.31 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. रुपयाचा हा नवा नीचांकी स्तर आहे. सलग दुसऱ्या सत्रात घसरणीचे संकेत आहेत.  यापूर्वी 10 जानेवारी रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 86.04 वर बंद झाला होता.

तज्ज्ञांच्या मते, रुपयाच्या या घसरणीचे कारण भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी अलिकडेच केलेली विक्री आहे. याशिवाय, भू-राजकीय तणावाचाही रुपयावर नकारात्मक परिणाम झाला आहे. रुपयाच्या घसरणीचा अर्थ असा की भारतासाठी वस्तूंची आयात महाग होईल. याशिवाय, परदेशात प्रवास करणे आणि शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यानं तेल आणि डाळींना आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम त्यांच्या किमतींवर होऊ शकतो. ही महागाई आपल्या स्वयंपाकघराचं बजेट खराब करू शकते. अभ्यास, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चं तेल, कम्प्युटर, लॅपटॉप, सोनं, औषधं, रसायनं, खतं, अवजड यंत्रसामग्री अशा आयात वस्तू महागण्याची शक्यता आहे.

ही घसरण प्रामुख्याने मजबूत अमेरिकन डॉलर आणि जागतिक बाजारपेठेतील सततच्या अस्थिरतेमुळे आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, परदेशी भांडवल सतत बाहेर पडणे आणि देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक कल यामुळेही रुपयावर दबाव आला, असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा चांगली रोजगार वाढ झाल्याने डॉलर आणखी मजबूत झाला आहे. यामुळे बेंचमार्क यूएस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली आहे. यामुळे फेडरल रिझर्व्ह त्यांच्या व्याजदर कपातीचा वेग कमी करू शकते अशी भीती निर्माण झाली आहे.

यामुळे शेअर मार्केटमध्येही मोठी घसरण पाहयला मिळाली. निफ्टी, सेन्सेक्समध्ये सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास 800 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीही 225 अंकांच्या घसरणीसह उघडला.

Share this story

Latest