हाँगकाँग फ्लूचे देशात दोन बळी
#नवी दिल्ली
एच ३ एन २ विषाणूमुळे होणाऱ्या इनफ्ल्यूएंझामुळे दोनजणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी देण्यात आली. यातील एक बळी कर्नाटकमध्ये तर दुसरा बळी हरयाणात नोंदवला गेला आहे. देशामध्ये एच ३ एन २ विषाणूची बाधा झालेले ९० रुग्ण असून एच १ एन १ विषाणूची बाधा असलेल्या आठ रुग्णांचीही नोंद झालेली आहे. एच ३ एन २ विषाणूची बाधा झाल्याने होणाऱ्या फ्ल्यूला हाँगकाँग फ्लू या नावानेही ओळखले जाते.
गेल्या काही दिवसांत कोव्हिडसारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून यातील बहुतेकजणांना एच ३ एन २ विषाणूचा संसर्ग झालेला आहे. इनफ्ल्यूएंझाच्या तुलनेत एच ३ एन २ विषाणूच्या बाधेमुळे बहुतेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. भारतात आतापर्यंत एच ३ एन २ आणि एच १ एन १ विषाणू आढळलेले आहेत
कर्नाटकमधील हसन येथे ८२ वर्षांच्या व्यक्तीचा झालेला मृत्यू हा एच ३ एन २ विषाणूने घेतलेला देशातील पहिला बळी मानला जातो. हिरे गौडा असे त्याचे नाव असून त्याला मधुमेह आणि उच्च रक्त दाबाचाही त्रास होता. त्याला २४ फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल केले होते. १ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एच ३ एन २ आणि एच १ एन १ विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गात जी लक्षणे दिसतात ती कोविडशी साम्य दर्शवणारी आहेत. कोविडमुळे जगभर जवळजवळ ६८ लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. कोविडचा संसर्ग झालेल्यांची जगभरातील संख्या तर प्रचंड होती. यामुळे कोविडसदृश लक्षणे दिसणाऱ्या हाँगकाँग फ्लूमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
वैद्यकीय तज्ञांच्या मते एच ३ एन २ विषाणू खूपच संसर्गजन्य असून खोकला, सर्दी आणि रुग्णाशी संपर्क आल्यास त्यातूनही त्याचा वेगाने प्रसार होतो.
सततचा खोकला, ताप, थंडी वाजणे, श्वासोच्छवासात अडथळे, घरघर ही हाँगकाँग फ्लूची लक्षणे आहेत. तसेच रुग्ण मळमळ, घसा खवखवणे, अंगदुखी, जुलाबाच्या तक्रारी करतात. ही लक्षणे किमान एक आठवडा तरी
रुग्णांमध्ये आढळतात.
संसर्गाचा प्रकार ओळखल्यानंतर रुग्णांना प्रतिजैविक औषधाचे उपचार करा, असे आवाहन डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केले आहे. अनावश्यक प्रतिजैविकांमुळे प्रतिरोध वाढण्याची शक्यता आहे. आता येणाऱ्या खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी या तक्रारी इनफ्ल्यूएंझाच्या असल्याचे आयएमएने म्हटले आहे.
एच ३ एन २ विषाणूचा वेगाने संसर्ग होत असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वृत्तसंंस्था