संग्रहित छायाचित्र
चेन्नई: तामिळनाडूमध्ये वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. चेन्नई महानगरपालिकेच्या क्षेत्रनिहाय एकत्रित पावसाचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः उत्तर आणि मध्य भागात ७ सेमीपेक्षा जास्त पाऊस झाला. बुधवारी (दि. ११) रात्री ते गुरुवार सकाळपर्यंत नोंदलेल्या बहुतांश पावसाची नोंद अधूनमधून मुसळधार पावसाच्या रूपात झाली. या कालावधीत शहरात सरासरी ५.३ सेमी पाऊस झाला असून, कोलाथूर येथे सर्वाधिक ८.५ सेमी आणि नेरकुंद्रम येथे ७.९ सेमी पावसाची नोंद झाली आहे.
तोंडियारपेट, पेरांबूर, माधवरम, बेसिन ब्रिज, अय्यापक्कम आणि अमिनजीकराई येथील ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या पर्जन्यमापक स्थानकांवर ७ सेमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चेन्नईत पावसाची शक्यता आहे. तिरुवल्लूर, रानीपेट, चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, कल्लाकुरीची, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तिरुवरूर, तंजावूर, पुदुकोट्टई आणि रामनाथपुरम येथे मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे हेनाई, विल्लुपुरम जिल्हे, तंजावर, मायिलादुथुराई, पुदुक्कोट्टई, कुड्डालोर, दिंडीगुल, रामनाथपुरम, तिरुवरूर, कांचीपुरम, अरियालूर, चेंगलपट्टू, पुद्दुचेरी आणि कराईकल या जिल्ह्यातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने गुरुवारी चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विल्लुपुरम, तंजावर, मायिलादुथुराई, रामनाथपुरम, दिंडीगुल, कुड्डालोर आणि पुदुक्कोट्टईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
शाळांसह महाविद्यालयांनाही सुट्टी
पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही गुरुवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. पुढील २४ तासांत ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेला श्रीलंका-तामिळनाडू किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता परिसरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.