कोिवडसदृश लक्षणांनी भीतीचे वातावरण
#नवी दिल्ली
देशाच्या विविध राज्यांत गेल्या दोन महिन्यात इन्फ्लुएन्झाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असून दीर्घ आजारपण आणि सततच्या खोकल्याने ते हैराण झाले आहेत. कोिवडच्या दोन वर्षांनंतर या कोिवडसदृश तीव्र लक्षणाच्या फ्ल्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चने म्हटले आहे की, इन्फ्लुएन्झा ए सबटाईप एच३एन२ विषाणूमुळे होत आहे. या विषाणूमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या दोन-तीन महिन्यांत देशाच्या विविध राज्यातून याबाबतच्या तक्रारी येत आहेत. आटोक्यात न येणारा खोकला आणि ताप याची लक्षणे असून ती दीर्घकाळ आटोक्यात येत नाहीत. या रोगाची लक्षणे तीव्र असून संसर्ग दूर होण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक काळ लागत आहे. या रोगावर मात केल्यानंतरही काही काळ ही लक्षणे रुग्णांत आढळतात, असे डॉ. अनुराग मेहरोत्रा यांनी सांगितले. इन्फ्लुएन्झाच्या अन्य विषाणूपेक्षा एच३एन२ विषाणूबाधितांना रुग्णालयात अधिक संख्येने दाखल करावे लागत आहे. डॉ. अनिता रमेश या म्हणाल्या की, इन्फ्लुएन्झाचा हा नवा स्ट्रेन प्राणघातक नाही. मात्र, काहीजणांना श्वसनाचा त्रास अधिक जाणवायला लागल्यावर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. यातील काहीजणांना कोिवडची लक्षणे आढळली. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली.
या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चने काय काळजी घ्यावी आणि काय टाळावे याबाबतची यादी प्रसिद्ध केली आहे. दुसऱ्या बाजूला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) प्रतिजैविक औषधांचा वापर टाळावा असे सुचवले आहे. रुग्णांमध्ये जी लक्षणे दिसत असतील केवळ त्याच्याशी संबंधित औषधे द्यावीत असे आवाहन डॉक्टरांना केले आहे. देशभरातील रुग्णांनी आपणाला ताप, खोकला, सर्दी, उलटीचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. प्रतिजैविक औषधाचे शरीरावर परिणाम होत असल्याने त्यांचा वापर आवश्यक असेल तेवढाच करावा. अन्यथा, जी लक्षणे दिसत असतील तेवढ्यापुरती औषधे द्यावी. प्रतिजैविक औषधाचा मारा टाळावा असेही आयएमएने म्हटले आहे. कोिवड काळात आम्ही ॲझिथ्रोमायसिन आणि आयव्हरमेक्टीनचा अतिरिक्त वापर केला. यामुळे औषधांचा परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. कोणत्याही प्रतिजैविक औषधांचा वापर करण्यापूर्वी संसर्ग नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे तपासण्याची गरज असल्याचे आयएमएने म्हटले आहे. या सर्वाला हवेतील प्रदूषण हा महत्त्वाचा घटक असून त्यामुळे ताप आणि श्वसनाचा त्रास होत असल्याच्या
तक्रारी वाढत आहेत. वृत्तसंंस्था