दिल्ली पोलीस राहुल यांच्या दारात
#नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नव्याने नोटीस बजावली आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान त्यांनी काश्मीरमध्ये केलेल्या एका विधानाबद्दल ही नोटीस बजावली आहे. त्या वेळी त्यांनी महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होत असल्याचे विधान केले होते. त्याबद्दल चौकशी करण्यासाठी या अगोदर एक नोटीस बजावली होती. दरम्यान, काँग्रेसने राहुल यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी भेट देण्याच्या घटनेबद्दल टीका केली असून काँग्रेसच्या अदानीसंबंधातील प्रश्नांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून पोलिसांच्या आडून त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.
याबाबत दिल्लीचे विशेष आयुक्त सागर प्रीत हुडा म्हणाले की, आम्ही राहुल यांची भेट घेतली. आपण केलेल्या विधानाबाबत पोलिसांना जी माहिती हवी आहे ती देण्यासाठी आपला थोडा अवधी हवा असे ते म्हणाले. आम्ही त्यांना नोटीस दिली असून ती त्यांच्या कार्यालयाने स्वीकारली आहे. याबाबत काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आम्ही जरूर विचारू.
राहुल यांच्या भेटीबाबत हुडा म्हणाले की, त्यांनी असे सांगितले की, भारत जोडो यात्रा खूप मोठी होती. या काळात आपणाला खूप माणसे भेटली. कोणी, कोणत्या समस्या काेठे मांडल्या याचा तपशील तातडीने देणे अशक्य आहे. आपण याबाबतची माहिती लवकरच देऊ. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर आम्ही आमच्या चौकशी कामास प्रारंभ करू.
राहुल यांच्या १२ तुघलक रोड मार्गावरील निवासस्थानी हुडा यांच्या नेतृत्वाखालील पथक १२ वाजता आले. हे पथक दोन तास तेथे होते. त्यानंतर ते निघून गेले. पोलीस निघून गेल्यावर राहुलही बाहेर पडले.
दरम्यान, काँग्रेसने राहुल यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी भेट देण्याच्या घटनेबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेने लाखो महिलांना देशात मुक्तपणे चालण्याचे, समस्या मांडण्याचे, वेदना प्रकट करण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. दिल्ली पोलिसांच्या आडून केंद्र सरकार त्रास देत आहे. दिल्ली पोलिसांच्या नोटिशीमुळे काँग्रेसच्या अदानीसंबंधातील प्रश्नांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रा संपल्यानंतर दिल्ली पोलिसांना जाग आली असून ते चौकशीला निघाले आहेत. राहुल यांचे कायदा सल्लागार त्याला उत्तर देतील. वृत्तसंस्था