गोहत्या करणारे नरकात सडतील!
#अलाहाबाद
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी गो हत्या करणारे नरकात सडतील अशी टिप्पणी केल्याने त्यावर आता सर्वत्र चर्चा होत आहे. गो हत्येच्या संदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी वरील आशयाची टिप्पणी करताना देशात गो हत्याबंदी लागू करायला हवी असे मतही व्यक्त केले आहे. त्याचवेळी न्यायमूर्ती अहमद यांनी गाईला राष्ट्रीय संरक्षित प्राणी म्हणून घोषित करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. ही सुनावणी आणि त्यावरील टिप्पणीवर सर्वत्र चर्चा होत आहे.
गाईची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या आरोपी विरोधातील याचिका रद्द करण्याची मागणी एकाने केली आहे. त्याच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी गाईला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व असल्याचे सांगितले. ही याचिका फेटाळताना न्यायमूर्ती अहमद म्हणाले की, गाईला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. देशभर गोहत्याबंदी कायदा लागू करण्याची गरज असून गाईंची हत्या करणारे नरकात सडतील अशी टिप्पणीही त्यांनी केली. गाईंचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व विषद करताना न्यायमूर्ती म्हणाले की, भारताच्या इसवीसन पूर्व सातव्या शतकांतही गाईंची पूजा होत असल्याचे उल्लेख आहेत.
वैदिक काळापासून देशात गाईची पूजा होत असून त्यात नव्याने काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत असे वाटत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून आपण सर्व धर्मांचा आदर करायला हवा. हिंदुत्वामध्ये असे म्हणतात की, गाय हे पावित्र्य आणि निसर्गाचे प्रतीक आहे. त्यामुळे गाईंचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे.
वृत्तसंंस्था