राजस्थानमध्ये भाजप विरुद्ध भाजप?
#जयपूर
राजस्थान विधानसभेची या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होत असून त्याच्या तयारीत सारे राजकीय पक्ष गुंतलेले आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता दिसते.
माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चुरू जिल्ह्यातील सालासार मंदिरात मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. दुसऱ्या बाजूला याच कार्यक्रमाच्या दिवशी युवा मोर्चा या भाजपच्या युवा शाखेने परीक्षा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी निदर्शने आयोजित केली आहेत. सर्व आमदारांना निदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभर गेहलोतविरोधी वातावरण निर्मिती करण्याची या मागे योजना होती.
वसुंधराराजे आजही राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची की पक्षादेश मान्य करून निदर्शनात सामील व्हायचे हा एक जटील प्रश्न आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांपुढे आहे. वसुंधराराजेंना विरोध असणाऱ्या नेत्यांना केंद्रातून पाठबळ मिळत असल्याने प्रदेश भाजपची दोन गटात विभागणी झाल्याचे दिसते. यामुळे गेहलोत यांच्या आव्हानाला एकसंध भाजप सामोरा जाईल की नाही याबाबत शंका आहेत. गेहलोत यांच्या निवासस्थानासमोरील निदर्शनाचे नेतृत्व प्रदेश भाजपचे अध्यक्ष सतीश पुनीया आणि विधानसभेतील भाजप उपनेते राजेंद्रसिंह राठोड करणार आहेत. एकावेळी पक्षाचे दोन कार्यक्रम होत असले तरी हे पक्षाच्या दोन गटाचे शक्तिप्रदर्शन असल्याच्या वृत्ताचा राठोड यांनी इन्कार केला आहे. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी याची दखल घेतली असून राजस्थानचे प्रभारी अरुणसिग यांना जयपूरला पाठवले असून ते सकाळी निदर्शनाच्या कार्यक्रमाला हजर राहतील. संध्याकाळी प्रदेश पदाधिकाऱ्यांबरोबर वसुंधराराजेंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमास हजर राहतील.
वसुंधराराजेंचा वाढदिवस हा शक्तिप्रदर्शनाचा भाग म्हणून पाहिले जाते. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधराराजे आजही जनतेत लोकप्रिय असून त्यांचे राज्याच्या सर्व भागात वर्चस्व आहे. भाजपने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले नसले तरी वसुंधराराजेंचे समर्थक त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून मानतात. वृत्तसंंस्था