बंगळुरू-म्हैसुरू प्रवास आता दीड तासांत
#नवी दिल्ली
बंगळुरू आणि म्हैसुरू या कर्नाटकातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा ११८ कि.मी.चा रस्ता तयार झाला असून केवळ दीड तासांत तुम्हाला बंगळुरूवरून म्हैसुरू गाठता येणार आहे. सध्या बंगळुरूवरून म्हैसुरूला जाण्यासाठी तीन तास लागतात. हा रस्ता बांधण्यासाठी ८ हजार ४८० कोटींचा खर्च झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी कर्नाटकला भेट देणार असून त्यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना असे सांगण्यात आले की, जागतिक दर्जाच्या मूलभूत सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्या हे पंतप्रधानांचे स्वप्न असून रविवारी त्यांच्या हस्ते बंगळुरू-म्हैसुरू महामार्ग राष्ट्राला अर्पण केला जाईल. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार रविवारी पंतप्रधान १६ हजार कोटींच्या कामाचा शुभारंभ करतील.
एनएच २७५ महामार्गाचा बंगळुरू-निदाघट्टा-म्हैसुरू हा ११८ कि.मी.चा सहा पदरी मार्ग आहे. हा महामार्ग जेथून जाणार आहे त्या भागातील सामाजिक आणि आर्थिक विकासाचे चित्र बदलणार आहे. म्हैसुरू-खुशालनगर या चार पदरी महामार्गाच्या उभारणीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या ९२ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी ४ हजार १३० कोटी खर्च होणार आहेत. या रस्त्यामुळे खुशालनगर आणि बंगळुरूमधील संपर्क व्यवस्था आणखी सहज होणार आहे. या दोन शहरातील प्रवासाचा सध्याचा वेळ पाच तास असून मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर अवघ्या दोन तासांत प्रवास पूर्ण करता येईल.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर कामाची माहिती देताना म्हटले आहे की, बंगळुरू-निदाघट्टा-म्हैसुरू मार्गावरील चार रेल्वे पूल, नऊ अन्य महत्त्वाचे पूल, ४० लहान पूल आणि ८९ भुयारी आणि उड्डाण पुलाच्या कामांचाही यात समावेश आहे. या महामार्गामुळे या भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे श्रीरंगपट्टणम, कूर्ग, उटी, केरळशी सहजपणे जोडले जाऊ.
वृत्तसंस्था