चीनला सीमेवर जशास तसे उत्तर
#नवी दिल्ली
भारत-चीन सीमा परिसरातील चीनच्या विस्तारवादी हालचाली हा भारतासाठी नेहमीचा डोकेदुखीचा विषय आहे. त्यातही गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांकडून सुरू असलेल्या कुरापतींना भारतीय सैनिकांनी जशास तसे उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. मात्र चीनच्या या कुरापती धोरणात्मक निर्णय घेत रोखण्यासाठी भारत सरकारने चीनशी संलग्न सीमेवरील लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) तुकड्या वाढवणे, वेदर टनेलची निर्मिती आणि सीमा परिसरातील पायाभूत विकासाला गती देण्याचे निर्णय घेतले आहेत.
भारत सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराचा वरचष्मा असावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने त्रिस्तरीय धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यातील पहिला निर्णय म्हणजे इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या सात नव्या तुकड्या उभारण्यात येणार आहेत. देशात २४ ऑक्टोबर १९६२ रोजी प्रथम इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत चीन आणि पाकिस्तानशी दोन हात करणारी आयटीबीपी भारतीय लष्कराचा अविभाज्य घटक आहे. सध्या आयटीबीपीच्या ४५ तुकड्या कार्यरत आहेत. याशिवाय ४ विशेष तुकड्या तैनात आहेत. यात आणखी नव्या सात तुकड्यांची भर पडणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ या सात तुकड्यातील जवान अहोरात्र चीनच्या उचापतींवर नजर ठेवू शकणार आहेत. सीमेच्या अतिसंवेदनशील परिसरातील लष्कराचे मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे.
सीमा परिसरातील पायाभूत सुविधांना वेग
सीमा परिसरातील गावांचा, खेड्यांच्या विकासाचा वेग वाढवण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्यामुळे हे ग्रामस्थ गाव सोडून परांगदा होणार नाहीत. या लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या नागरिकांच्या मदतीने चीनच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. गलवान, तवांग, सियाचीन आणि तिबेटमध्येही आयटीबीपीच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.
वृत्तसंंस्था