शरद पवारांच्या एकेरी उल्लेखाने वातावरण तापले
शरद पवारांच्या एकेरी उल्लेखाने वातावरण तापले
#मुंबई
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या दिवसापासून वादळी ठरत आहे. चौथा दिवसदेखील त्याला अपवाद ठरला नाही. भाजप आमदार राम सातपुतेंनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे गुरुवारी (दि. २) वातावरण चांगलचे तापले.
‘‘मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलं, म्हणून मी विधानसभेत निवडून आलो. मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिलेलं नाही,’’ असं राम सातपुते म्हणाले. त्यामुळे विरोधी पक्षाने आक्रमक होत गदारोळ केला. विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्षेपानंतर राम सातपुते यांनी अखेर आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
विरोधी पक्षनेते अजित पवारदेखील यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते. सातपुते यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर ते आमदारांसह वेलमध्ये आले होते. विरोधकांनी सातपुतेंवर कारवाईची मागणी केली. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘‘सभागृहात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख योग्य नाही. असे चुकीचे पायंडे पडणार असतील तर आमच्या बाजूनेदेखील वरिष्ठ नेत्यांबाबत वेगळ्या प्रकारची वाक्यरचना करण्यात येईल. त्याबाबत माफी मागितली जाणार नाही. आम्हीही म्हणू तपासा आणि रेकॉर्डवरून काढायचं असेल तर काढा.
आम्ही वरिष्ठांचा आदर करतो तसा त्यांनीदेखील आमच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे.’’वृत्तसंस्था