तरुणांसाठी मोठी संधी
#हरिद्वार
देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. शिक्षण घेऊनही तरुणांच्या हातांना काम मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच विरोधक मोदी सरकारला अधूनमधून या मुद्यावर धारेवर धरत असतात. सरकारनेही बेरोजगारीची समस्या असल्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी देशातील तरुणांना संन्यासी बनण्याचे निमंत्रण दिले आहे. यासाठी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती शेअर करण्यासोबतच याबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीदेखील प्रसिद्ध केल्या आहेत.
संन्यासी बनण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील याबद्दलची माहितीही बाबा रामदेव यांनी दिली आहे. देशभरातील तरुणांना मोठ्या प्रमाणात संन्यासी होता यावे, यासाठी त्यांनी संन्यासी महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे म्हटले आहे. २२ मार्चपासून हा महोत्सव सुरू होईल आणि रामनवमी म्हणजेच ३० मार्चपर्यंत चालेल. इतकेच नाही तर यासाठी १२वी पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करू शकतात.
बाबा रामदेव यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले की, कोणत्याही जाती आणि समुदायात जन्म घेतलेला साधारण व्यक्ती देखील मोठी क्रांती करू शकतो. फक्त तो पराक्रमी आणि प्रचंड पुरुषार्थी असावा. तरुणांनी रामनवमीच्या दिवशी पतंजली येथे जायचे आहे आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन संन्यासी जीवन जगायला सुरुवात करायची आहे. युवकांनी मोठ्या संख्येने पतंजली विश्वविद्यालयात येऊन शिक्षा-दीक्षा घ्या आणि स्वतःमध्ये महान ऋषींप्रमाणे
व्यक्तित्व निर्माण करावे, असे आवाहन बाब रामदेव यांनी केले आहे.
तुम्ही पुढाकार घ्या आम्ही घरच्यांशी
संवाद साधू
पोस्टरमध्ये पुढे म्हटले आहे की, कोणत्याही जाती आणि प्रांतातील माता-पिता आपल्या मुलांना शिक्षा-दीक्षा घेऊन आपल्या कुळाचे नाव उंचावण्यासाठी स्वामी रामदेव यांच्याकडे संन्यासाकरिता पाठवू शकतात. ही मुले सनातन धर्मासाठी समर्पित राहतील. याच्या पुढे जात जर कोणी स्वेच्छेने संन्यास घेण्याचा विचार करत असेल आणि त्याचे आई-वडील यासाठी अज्ञानातून किंवा मोहापोटी हे समजून घेत नसतील तर ते आई-वडिलांच्या परवानगीशिवाय देखील पतंजली योगपीठात येऊ शकतात. स्वामी रामदेव आणि महर्षी दयानंद यांच्यासारखे संन्यासी असेच तयार झाले आहेत. पतंजली विद्यापीठात योगामध्ये बीए, एमए, बीएएमएस आणि बीवायएनएस तसेच तत्त्वज्ञान, वेदशास्त्र आणि व्याकरणासह संस्कृत आणि साहित्यातील बीए आणि एमए करता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. वृत्तसंस्था