तलवारबाजीचे प्रदर्शन अन हृदयविकाराचा झटका
#उज्जैन
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्याच्या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमध्ये संपूर्ण शहर रंगपंचमी साजरी करत रंगांची उधळण करत असताना, महाकालेश्वर मंदिरातही सेलिब्रेशन सुरू होते. या सेलिब्रेशनमध्ये पुजारी मंगेश गुरू यांचा मुलगा मयांकही सहभागी झाला होता. पण यानंतर मात्र त्याला आपला जीव गमवावा लागला.
तरुण वयातील लोकांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रंगपंचमीच्या उत्सवात पारंपरिक तलवारबाजीचे प्रदर्शन करून घरी आलेल्या मयांकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी रंगपंचमीला मंदिरात तलवारबाजी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हीडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मयांक तलवारबाजी करताना दिसत आहे.
हा व्हीडीओ महाकाल मंदिर परिसरातील आहे, ज्यामध्ये आकाशी निळा शर्ट आणि पांढरी पँट घातलेला मयांक हातात एक लांब तलवार धरून पारंपरिक पद्धतीने तलवारबाजीचे कौशल्य दाखवत आहे. सुमारे १६ सेकंदांच्या या व्हीडीओत मयांक पूर्ण उत्साहाने तलवारबाजी करत आहे. हे करताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. या कारणास्तव तो घरी परतला. त्यानंतर त्याचा घरीच मृत्यू झाला.
मयांकने घरी आल्यावर त्याला घाबरल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. त्याच्या चेहऱ्यावरदेखील घाम दिसत होता. कुटुंबीयांना काहीतरी अघटित होण्याची भीती वाटल्याने त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मयांक हा वडिलांसोबत मंदिरातील पूजेच्या कामात मदत करत असे. तो दहावीत शिकत होता. त्याला दोन बहिणी आहेत. त्याच्या निधनामुळे मंदिरातील सर्व पुजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मयांकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. साधारणपणे असा हृदयविकाराचा झटका मधुमेही रुग्णाला येतो, ज्यामध्ये अटॅक आल्यानंतर लगेच मृत्यू होत नाही. तसेच रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे, असे वाटत नाही. वृत्तसंस्था