शशांकचेही बुडाले पैसे

गेल्या काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपण केलेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने सोशल मीडियावर जाहीरपणे खंत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. कलाकार वेळेत काम करूनही निर्माते अनेकदा वेळेवर मानधन देत नाहीत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 04:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपण केलेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने सोशल मीडियावर जाहीरपणे खंत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. कलाकार वेळेत काम करूनही निर्माते अनेकदा वेळेवर मानधन देत नाहीत. यामुळे कलाकारांचे आर्थिक नुकसान होतेच, शिवाय पैसे मिळेपर्यंत होणारा मनस्ताप वेगळा… या सगळ्या प्रक्रियेला वैतागून शेवटी कलाकार सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्या समस्या मांडणे योग्य समजतात.

सिनेविश्वात नाटक, मालिका, चित्रपट याशिवाय वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते.  त्याने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेले आहे. याशिवाय शशांक गेल्या काही वर्षात मराठीसह अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्येसुद्धा झळकला आहे. अभिनेत्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘गुनाह’ सीरिज गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचा पहिला भाग जून २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता दुसरा भाग ३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला. मात्र, दुसरा भाग आला तरी, पहिल्या भागाचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते असे सांगत अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. पहिल्या सीझनचे पैसे न मिळाल्याने शशांकने दुसऱ्या सीझनच्या डबिंगला नकार दिला होता. यामुळे त्याच्याऐवजी एका वेगळ्या डबिंग आर्टिस्टकडून काही सीन्ससाठी डब करून घेण्यात आले, असे अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

शशांक केतकर म्हणाला, 'गुनाह सीझन २’ आजपासून सुरू पण… सीझन २ चे शूटिंग संपले होते तरी, सीझन १ चे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते आणि सीझन १ चे पैसे मिळाल्याशिवाय सीझन २ चे डबिंग करणार नाही, अशी अट घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करून घेतली आहेत. याविषयी डिटेलमध्ये बोलेनच. शशांक आता या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुरांबा’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Share this story

Latest