संग्रहित छायाचित्र
छोट्या पडद्यावरील 'अबीर गुलाल' ट्या पडद्यावरील 'अबीर गुलाल' या मालिकेने अवघ्या सहा महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली. मालिकेतील मुख्य अभिनेता अक्षय केळकर याने मालिकेच्या अचानक बंद होण्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करत छोट्या पडद्यावरील कलाकार आणि निर्मात्यांच्या संघर्षांची वेगळी बाजू मांडली आहे. टीआरपीच्या स्पर्धेत टिकूनही मालिका बंद होण्यामागची कारणे कलाकारांपर्यंत पोहोचत नसल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच टीव्ही उद्योगातील बदलत्या आर्थिक गणितांमुळे कलाकार आणि निर्मात्यांवर होणाऱ्या परिणामांवरही त्याने प्रकाश टाकला आहे.
'आपली मालिका बंद होतेय' हा निरोप कानावर पडणे हे प्रत्येक कलाकारासाठी नक्कीच धक्कादायक असतं. टीआरपीच्या शर्यतीत आमची 'अबीर गुलाल' ही मालिका चांगल्या क्रमांकावर होती. तरीही मालिका बंद होण्यामागे इतर काय कारण आहे? हे आम्हा कलाकार किंवा माझ्यापर्यंत तरी आले नाही. अवघ्या सहा महिन्यांत मालिका बंद झाली. टांगती तलवार आमच्या मालिकेवर तशी होतीच. कारण, शेवटी-शेवटी नव्या मालिका सुरू होणार आहेत असे सातत्याने आमच्या कानावर येत होते. मात्र आमच्या मालिकेचा टीआरपी चांगला आहे म्हणून आम्ही निर्धास्त होतो.
पण तसे झाले नाही. 'तुमची मालिका बंद होणार आहे' असा निरोप अचानक कानावर येणे याची सवय कलाकारांनी करून घ्यायला हवी. कारण, कलाकारांच्या हाती तसेही काहीच नसते. कोणताही कलाकार स्वतःची अशी काही आर्थिक गणिते बांधतो. मालिका नवी आहे; चांगली चालतेय म्हटल्यावर ती दीड- दोन वर्षं नक्कीच सुरू राहील, असा विश्वास त्या कलाकाराला असतो. चांगले काम आणि हाती चार पैसे येतील म्हणून मी ती मालिका करत होतो; पण हाती शेवटी चारच पैसे आले.
कलाकार, मालिकेची तांत्रिक मंडळी आणि निर्मिती संस्था असे आमच्यात कुटुंबासारखे नाते तयार झाले होते. खेळकर कुटुंबाप्रमाणे आम्ही सर्व जण सहा महिने नांदलो. रुसवे-फुगवेदेखील कधी झाले नाहीत.