Mahavikas Aghadi
एकिकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन इंडिया आघाडीत बिनसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे राज्यातही महाविकाआघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेती नेते विरुद्ध काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. या सर्व राजकीय घडामोडी पाहता राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीचे नेमकं काय होणार? महाविकासआघाडी राहणार की दुभागणार? असं सवाल उपस्थित होत आहेत. अशातच शरद पवार यांनी मोठं विधान करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा नारा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीदेखील तसे संकेत दिले आहेत. ठाकरेंच्या या भूमिकेसंदर्भात शरद पवार यांनी प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पवार यांनी सूचक शब्दात आघाडीतील नेत्यांना संकेत दिले.
पवारांनी नेमकी काय भूमिका मांडली?
इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी आणि आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसलो, त्यावेळी आमचा प्रयत्न देश पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत, त्यामध्ये एकत्र येण्याचा विचार होता. राज्यातील आणि विशेषतः स्थानिक पातळीवरच्या त्या सगळ्या निडवणुकांमध्ये आपण एकत्रित काम करावं, अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही."
राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा या आघाडीत होत होत्या. महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या भूमिकेबाबत खुलासा केला आहे का, ते माहिती नाही. परंतु, एक स्वच्छ सांगतो की, आता बारामती आणि इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तिथे आम्ही आघाडीचा विचार केला नाही. करणार नाही. असे असले तरी आता येत्या आठ ते दहा दिवसांत आम्ही एक बैठक घेणार आहोत, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बाहेर आहेत, ते परत आले की, संघटनात्मक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत, अशी माहितीही शरद पवार यांनी यावेळी दिली.
स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये एकत्रित काम करावे, अशी चर्चा झाली नसली तरी आता ज्या पद्धतीने वृत्तपत्रांनी नोंद घेतली. त्यानंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूवर एकत्र येण्यासाठी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. सर्वांना मिळून करू. आमची भावना आहे की एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे, असेही शरद पवारांनी यावेळी नमूद केले.