संग्रहित छायाचित्र
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला आहे. याशिवाय, वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
सीआयडीला ताब्यात देण्याची मागणी
मोक्का लागू केल्यानंतर, सीआयडीने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात कराडला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं आहे. (Beed Sarapanch Murder Case)
सरपंच हत्या प्रकरण आणि कराडचा संभाव्य सहभाग
वाल्मिक कराडवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा कराडशी थेट संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे कराडने हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं की, या प्रकरणातील इतर आरोपींसह वाल्मिक कराडला (Walmik Karad) समोरासमोर बसवून चौकशी करणं गरजेचं आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असला तरी, आंधळेच्या अटकेशिवाय तपास पूर्ण होणं अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे. देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला आहे, तरी अद्यापही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून लोक न्यायाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिक खोल जात असून, वाल्मिक कराडच्या चौकशीनंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. आता कराडला सीआयडीच्या ताब्यात दिलं जातं का, याचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. त्याचबरोबर फरार आरोपींच्या अटकेकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.